पोलीस तपासात नर्सने आणखी २७ जणांना मारण्याची तयारी केली होती हे उघड
न्यायालयाने आरोपी नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावली
जर्मनी : जर्मनीतील वुर्सेलेन येथे एका हॉस्पिटलमधील नर्सने कामाचा लोड आल्याने १० जणांचा जीव घेतला. शिवाय ही नर्स आणखी २७ जणांना मारण्याच्या तयारीत होती. याप्रकरणी नर्सला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम जर्मनीतील वुर्सेलेन शहरातील एका रुग्णालयात सदर आरोपी तरुणी नर्स म्हणून काम करत होती. तिने २००७ मध्ये तिचे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केले होते. २०२० पासून ती रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. एके दिवशी तिच्यावर हॉस्पिटलमधील कामाचा लोड आला.
कामाचा लोड आल्याने तिची चिडचिड होऊ लागली. सतत तेच तेच काम आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची बोलणी ऐकून ती संतापली. शेवटी तिने हॉस्पिटलमधील रुग्णांना जीवे मारण्याचे ठरवले. म्हणून तिने रात्रीच्या ड्युटीवर असताना वृद्ध रुग्णांना मोठ्या प्रमाणात वेदनाशामक आणि झोपेची अतिरिक्त औषधे दिली. रुग्णांना लवकर झोप लागावी आणि रात्रभर काम करावे लागू नये, हा त्या नर्सचा उद्देश होता.
सतत होणाऱ्या अतिरिक्त गोळ्यांच्या माऱ्याने १० जणांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ होणाऱ्या मृत्यूने हॉस्पिटलच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला. यानंतर डॉक्टरांना या प्रकरणात संशय आल्याने याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केल्यावर त्यांच्या तपासात ही बाब समोर आली.
पोलिसांनी या प्रकरणी नर्सला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी म्हटले की सदर तरुणीला वर्क लोड असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. ती आणखी २७ जणांना मारण्याच्या प्रयत्नांत होती. मात्र तिचा हा प्रयत्न असफल ठरला आहे. मात्र तिने निष्पाप १० जणांचा जीव घेतला आहे. न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.






