Monday, December 29, 2025

एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा

एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील अंतिम उमेदवार यादीवर आक्षेप घेत एमसीएच्या काही सदस्यांनी या यादीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी आव्हान फेटाळल्याचा सविस्तर निकाल न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. यामुळे बहुचर्चित एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी घेत तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर करू नका, असा आदेश न्यायालयाने जारी करत या याचिकेवर गुरुवारी पुन्हा सुनावणी घेतली. गुरुवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, त्यांचा आक्षेप का फेटाळण्यात आला?, याचा सविस्तर आदेश संबंधित निवणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना नुकताच प्राप्त झाला आहे. त्याचा अभ्यास करून त्यानुसार याचिकेत बदल करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार याचिकाकर्त्यांना उद्यापर्यंतची मुदत देत हायकोर्टाने यावर, शुक्रवारी पुन्हा सुनावणी घेण्याचे निश्चित केले. मात्र याचिकाकर्त्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. तसेच भविष्यात त्यांना गरज वाटल्यास यासंदर्भात नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे येत्या १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर एमसीएचे जुने सदस्य श्रीपाद हळबे आणि अन्य काही जणांनी आक्षेप घेत आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या. तसेच २४ ऑक्टोबर रोजी थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा आरोप करत हळबे आणि इतरांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Comments
Add Comment