नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात महाराष्ट्रातल्या गंगेची आरती केली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने या गोदाआरतीचे आयोजन केले होते. या प्रसंगी ‘जय देवी सूरसरिते गोदावरी माता’ या सुरांनी परिसर दुमदुमून गेला आणि सियावर रामचंद्र की जय, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगव्या वातावरणाने आसमंत भरुन गेला.
आरतीनंतर मार्गदर्शन करताना मंत्री राणे म्हणाले की, “गोदा आरतीचे इतक्या भव्य स्वरूपात आयोजन पाहून कुंभमेळा आता होत असल्याचा भास होत आहे. आरतीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही अभिमानाची बाब आहे.” भारतीय संस्कृती महान असून, ती टिकवण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे“सनातन धर्म श्रेष्ठ आहे आणि तो लोकांच्या परिश्रम व श्रद्धेमुळे टिकून आहे. येत्या कुंभमेळ्यात नाशिकचे महाकुंभ आयोजन जगाला आश्चर्यचकित करेल, असा मला विश्वास आहे. “आरती ही केवळ विधी नसून ती श्रद्धा आणि संतज्ञानाचा संगम आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि नदीचे शुद्धीकरण हे आपले कर्तव्य आहे. जल, मंत्र आणि प्राणायाम यांमुळे मन व शरीराचे शुद्धीकरण होते. त्यामुळे चिंतामुक्त व्हावे असे आवाहनही राणे यांनी केले.
यावेळी समितीच्यावतीने मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीपूर्वी झालेल्या सत्संगात ‘अंबे जगदंबे जय अंबे’, ‘भोले की जय जय’, ‘जय शिवशंकर हर हर शंकर’ यांसारख्या भजनांनी धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले.यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,सुधाकर बडगुजर,सुरेश पाटील, व्यंकटेश मोरे,राजेंद्र फड, खोचे गुरुजी, जयंत गायधनी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
View this post on Instagram






