Friday, November 7, 2025

मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

राज्यभरात तापमान कमी होणार

मुंबई  : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. अजूनही काहींमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी आता तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात होणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसानंतर अखेर मुंबईसह, विदर्भ मराठवाड्यात थंडीची चाहूल लागणार आहे.

भारतीय व हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ ते ७ नोव्हेंबरपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान ४ ते ५ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात स्पष्ट बदल जाणवेल. मात्र पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण व गोवा भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन दिवसांत किमान तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर गोंगावणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती धूसर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घटणार आहे. तसेच पाऊस जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई उपनगरासह कोकणपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. हवेत आर्द्रता व ओलावा कायम होता.

Comments
Add Comment