ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. थंड वारे, कोरडी हवा आणि स्क्रीनसमोर वाढलेला वेळ या सगळ्यांचा परिणाम थेट डोळ्यांवर होत असून डोळे कोरडे पडणे, लालसरपणा, चुरचुरणे आणि दृष्टी धूसर होणे या तक्रारी वाढू शकतात.
हिवाळ्याच्या मोसमात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्यामुळे थंडी काहीशी लांबली आहे. मात्र थंडीच्या दिवसात डोळ्यांची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. या काळात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यासाठी घरात ह्यूमिडिफायर वापरणे, पुरेसे पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आर्टिफिशियल टिअर्स (कृत्रिम अश्रू) वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
कोरड्या हवेमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते
''थकवा आणि झोपेअभावी डोळ्यांत कोरडेपणा येतो. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेतल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते आणि ते ताजेतवाने राहतात. डोळ्यांत खाज, लालसरपणा, पाणी येणे किंवा दृष्टी धूसर होणे या तक्रारी वाढल्यास स्वउपचार न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.'' - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्रतज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय ठाणे)
काय काळजी घ्याल :
बाहेर पडताना डोळ्यांवर थंड वाऱ्याचा आणि धुळीचा थेट परिणाम होतो. त्यामुळे सनग्लासेस किंवा संरक्षणात्मक चष्मा वापरणे आवश्यक आहे. हे डोळ्यांना थंडी, धूळ आणि तीव्र प्रकाशापासून बचाव करत असल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.
गाजर, पालक, बदाम, अक्रोड आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांचा पुरवठा केल्यास दृष्टीसंबंधी त्रास कमी होऊ शकतो.
प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंद स्क्रीनपासून दूर पाहण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो.






