टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश
नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून टाइम आऊटने केलेल्या एका नवीन सर्वेक्षणातून प्रथम स्थान मिळाले आहे. सांस्कृतिक चैतन्य, खाद्यसंस्कृती, नाईट लाईफ आणि जीवनाची गुणवत्ता या घटकांवर आधारित हे सर्वेक्षण होते. या यादीत बीजिंग आणि शांघाय अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
या सर्वेक्षणात १८,००० हून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला. मुंबईतील ९४ टक्के रहिवाशांनी शहर आनंदी असल्याचे सांगितले आणि ८९ टक्के लोकांनी 'इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा आम्ही येथे अधिक आनंदी आहोत' असा दावा केला. तसेच, सुमारे ८७ टक्के लोकांनी शहरातील आनंद निर्देशांक अलिकडच्या वर्षांत वाढला असल्याचे मत व्यक्त केले.
चीनमधील बीजिंग आणि शांघाय येथील ९० टक्क्यांहून अधिक सहभागींनी त्यांच्या राहणीमानावर समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या टोकियोसारख्या पूर्वेकडील आशियाई शहरांनी आनंदाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. टोकियोमध्ये केवळ ७० टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.






