मनाचा गाभारा : अर्चना सरोदे
भारत हा प्राचीन संस्कृतीचा देश आहे. येथे असंख्य देवी-देवता, झाडे, वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांची पूजा केली जाते. इथे रूढी आणि परंपरेनुसार चालत आलेले सर्व सण साजरे केले जातात. हिंदू धर्मामध्ये प्रदक्षिणा आणि परिक्रमा याला फार महत्त्व आहे; परंतु प्रदक्षिणा आणि परिक्रमा यातील फरक लक्षात घेता प्रदक्षिणा म्हणजे देवता किंवा मंदिराला भक्तिभावाने घातलेली फेरी आणि परिक्रमा म्हणजे एखाद्या नदी, पर्वत अथवा तीर्थक्षेत्राला भक्तिभावाने घातलेली फेरी.
‘‘यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च। तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिण पदे पदे।।”
अर्थ : हे परमेश्वरा! माझे या जन्मी आणि मागील जन्मी केलेल्या सर्व पापांचा नाश तुझ्या प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलाने होवो.
प्रदक्षिणा ही षोडशोपचार पूजेचा एक भाग आहे. प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करण्याची प्रथा खूप प्राचीन आहे. वैदिक काळापासून, ती एखाद्या व्यक्ती, मूर्ती किंवा पवित्र स्थानाबद्दल असलेली भक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग मानली जाते. संपूर्ण जगात प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करण्याची प्रथा ही हिंदू धर्माची देणगी आहे. तसेच धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार इथे पर्वत आणि नद्यांची परिक्रमा पण केली जाते. अशाच एका महत्त्वाच्या परिक्रमेविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नर्मदा ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मैकल पर्वताच्या अमरकंटक शिखरावर होतो. अमरकंटक हे मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील विंध्य आणि सातपुरा पर्वतरांगांमध्ये एक लहान गाव आहे. त्याच्या जवळच, नर्मदा एका गोमुखातून उगम पावते. तेराशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर, नर्मदा अमरकंटकमधून उगम पावते व विंध्य आणि सातपुरा पर्वतरांगांमधून भरूच जवळ, खंभात इथल्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते. असे म्हटले जाते की, मेकाल, व्यास, भृगू आणि कपिल यांसारख्या ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती. अमरकंटक हे ध्यान करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. नर्मदा नदी देशातील इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते. पर्वतीय नदी असल्याने, तिचा प्रवाह अनेक ठिकाणी खूप उंचीवरून येतो. अनेक ठिकाणी ती मोठ्या खडकांमधून गर्जना करत येते. भारतातील नद्यांमध्ये नर्मदा नदीचे एक वेगळे महत्त्व आहे. तिने असंख्य भूमींना समृद्ध केले आहे म्हणून तिला जीवनदायिनी असे म्हणतात.
मध्य प्रदेशबरोबरच गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग तिने समृद्ध केला आहे. आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते तशीच ती इथल्या लोकांची काळजी घेते म्हणून तिला इथे नर्मदा मय्या असे म्हणतात. नर्मदा मय्याचे वाहन मगर आहे. नर्मदा माता फक्त मगरीवर स्वार होऊन प्रवास करते. आपणही आजपासून नर्मदा मय्याच्या परिक्रमेच्या प्रवासाला जाऊया; परंतु तत्पूर्वी नर्मदा मय्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारत आणि रामायण ग्रंथांमध्ये नर्मदा माईला “रेवा” असे म्हटले आहे, नर्मदा माई आणि गंगा मय्या या दोन्ही पवित्र नद्या आहेत. गंगामय्यामध्ये स्नान केल्याने मानवाचे पाप धुतले जाते आणि नर्मदा मय्याच्या केवळ स्मरणाने पापांचा नाश होतो. अशी ही एक मान्यता आहे की जेव्हा गंगामय्या मनुष्याचे पाप धुऊन मलिन होते तेव्हा वर्षातून एकदा गंगा मय्या स्वतः काळ्या गाईच्या रूपात येते आणि नर्मदा मय्यामध्ये स्नान करते आणि पापांपासून मुक्त झाल्यानंतर पांढरी होऊन परतते. असे म्हणतात की, गंगा ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते, यमुना भक्तीचे प्रतिनिधित्व करते, ब्रह्मपुत्रा तेजाचे प्रतिनिधित्व करते, गोदावरी संपत्तीचे प्रतिनिधित्व करते, कृष्णा इच्छांचे प्रतिनिधित्व करते आणि सरस्वती ज्ञान स्थापित करण्याचे प्रतिनिधित्व करते, तर नर्मदा माई ही त्यागाचे मूर्त स्वरूप आहे. संपूर्ण जग तिच्या पवित्रतेसाठी, चैतन्यशीलतेसाठी आणि शुभतेसाठी तिचा आदर करतं आणि तिची पूजा करतं. नर्मदा मय्या जगातील पहिली नदी आहे जी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते. नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा ही एक धार्मिक तीर्थयात्रा आहे. जो कोणी नर्मदा मय्याची परिक्रमा पूर्ण करतो त्याला मायेचा हा भवसागर पार करून मोक्षाची प्राप्ती होते. म्हणूनच तिला मोक्षदायिनी असे देखील म्हणतात. पुराणांमध्ये या नदीचा तपशीलवार उल्लेख “रेवाखंड” या वेगळ्या नावाने केला आहे. नर्मदा परिक्रमा ही अतिशय महत्त्वाची आहे, रहस्य आणि साहसाने भरलेली तर आहेच; परंतु त्याचबरोबर अनुभवांचा खजिना देखील आहे. चला तर मग आजपासून आपणही नर्मदा मय्याच्या परिक्रमेच्या प्रवासाला निघू या.. नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर!






