Thursday, November 6, 2025

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा?

मुंबई : मुंबईच्या मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर आज (गुरुवार) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनखाली चिरडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात तीनजण जखमी झाले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अचानक आंदोलनामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती आणि याच गोंधळाचा फटका या निष्पाप प्रवाशांना बसल्याचा आरोप होत आहे.

नेमके काय घडले?

मुंब्रा येथील जुन्या अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज सायंकाळी ५.४० ते ६.४० दरम्यान सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले.

या एक तासाच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी, सीएसएमटी, दादर, ठाणे, कुर्ला यांसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमा झाली. रेल्वे सुरू होण्याची आशा मावळल्यानंतर, काही प्रवाशांनी नाइलाजाने रेल्वे रुळांवरून चालत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि हळूहळू लोकल सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, याच दरम्यान सॅन्डहर्स्ट रोड स्थानक परिसरातून मस्जीद बंदर स्थानकाकडे रुळांवरून चालत जाणाऱ्या प्रवाशांना वेगाने आलेल्या लोकलचा फटका बसला. या भीषण अपघातात ५ जणांना लोकलने चिरडले असून, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ऐन गर्दीच्या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे आणि त्यानंतर रुळांवर उतरलेल्या प्रवाशांमुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवाशांकडून थेट रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आणि प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर दोषारोप केले जात आहेत.

दोष कुणाचा?

एकीकडे रेल्वे अभियंत्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे प्रवाशांनी एक तास लोकल बंद राहिल्याने धाडस करत रुळांवरून चालणे सुरू केले. या दुर्घटनेमुळे दोन जीवांचा बळी गेला आहे. या मृत्यूसाठी तांत्रिकदृष्ट्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करणारी यंत्रणा, आंदोलन करणारे कर्मचारी की हताश होऊन रुळांवर उतरणारे प्रवासी, यापैकी कोणाला जबाबदार धरणार, हा कळीचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Comments
Add Comment