आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य
जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि महाराष्ट्र यांच्यात साम्य असून यांचा एकमेकांशी दृढ संबंध आहे. सध्या महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या यावर चिंता व्यक्त करताना राजस्थानमध्ये हे दृश्य दिसत नसल्याचे आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच विद्यापीठाचे मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सुरेशपाल सिंग तंवर यांनी सांगितले.
मारवाडी लोक करोडो रुपये घेऊन फिरत असले तरी चहाच्या टपरीवर ते सहज बसतात. कोणतीही गोष्ट सहज सोपी करणे त्यांना जमते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या समस्येला मारवाडी मानसिकता मदत करू शकते, असे स्पष्ट करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय असला तरी, राजस्थानमध्ये काम करणाऱ्या काही तज्ज्ञांना वाटते की ‘मारवाडी मानसिकता’ ही समस्या सोडवू शकते.
राजस्थानमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी पाऊस, आव्हानात्मक वातावरण असले तरी, शेतीच्या कारणांमुळे या प्रदेशातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही, असे डॉ. एस. पी. एस. तन्वर यांनी पीआयबीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सुविधेला भेट देणाऱ्या पत्रकारांना यावेळी सांगितले.
राजस्थानातील शेतकरी जोखीम पत्करत नाहीत
ते म्हणाले, राजस्थानच्या कोरड्या जमिनीत फक्त २०० मिमी ते ६०० मिमी पाऊस पडतो; परंतु या प्रदेशातील लोकांना पाण्याचे मोल समजते आणि म्हणूनच त्यांनी विविध रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्रे विकसित केली आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात परिस्थिती वेगळी आहे, जिथे पुरेसा पाऊस पडतो; परंतु तरीही या प्रदेशातून पिके न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे नोंदवली जातात. महाराष्ट्रातील शेतकरी जोखीम पत्करतात आणि शेतात मोठी गुंतवणूक करतात आणि भरपूर उत्पादन मिळवण्याचा अंदाज लावतात, तर राजस्थानी शेतकरी त्यांच्या मर्यादेत काम करतात. हे शेतकरी जोखीम पत्करत नाहीत. मारवाडी मानसिकता अशी आहे की, जेव्हा तुम्ही पैसे कमवाल तेव्हाच पैसे गुंतवा; ते पैसे कमावण्याच्या आशेने कधीही पैसे गुंतवणार नाहीत, असे ते म्हणाले.
पीक उत्पादनात विविधता आवश्यकता : तंवर यांनी राजस्थानला पावसाच्या पाण्याचे संचयन करण्याच्या अनेक पद्धती शिकवल्याचे श्रेय महाराष्ट्राला देतात. ते म्हणाले की, पावसाच्या पाण्याचे संचयन महाराष्ट्रात सुरू झाले; परंतु नंतर राजस्थानने त्याचे अनुकरण केले. पिकांच्या अपयशामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा धोका कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक उत्पादनात विविधता आणणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.






