Monday, November 3, 2025

पावसातली भात कापणी...!

पावसातली भात कापणी...!

“अवंधू भात बरा व्हता. मॉप तांदूळ झालो आसतो. पण या पावसावर वशाडी इली ना. हातातोंडाक गावणारो घास या पावसाच्या उच्छादान नाय करून टाकल्यान” हा संवाद अवघ्या कोकणातील पालघरपासून बांद्यापर्यंत सध्या कानावर येतोय. त्याचे कारणही तसेच घडले आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिना म्हटला की उष्णतेच्या झळा सोसाव्या लागायच्या. 'ऑक्टोबर हीट' हा शब्द कानी पडायचा; परंतु यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जून-जुलै महिन्यात कोसळावा तसा पाऊस कोसळत आहे.

महाराष्ट्रामध्ये ऋतुचक्र कशा पद्धतीने बदलत आहे, हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहत आहोत. पूर्वी काही दुष्काळी जिल्हे म्हणून ज्यांची ओळख होती, त्या भागातून अलीकडे विपुल पाणीसाठा उपलब्ध आहे. काही भागातील सिंचन प्रकल्प काही प्रमाणात पूर्ण झाल्याने, ज्या भागावर दुष्काळी सावट होते, ते पाण्याने दूर होताना आपणाला पाहायला मिळत आहे. पूर्वी राज्यातील दुष्काळी भागात आकाशात दाटलेले ढग जरी गावकऱ्यांनी पाहिले, तरीही शेतकरी आनंदी व्हायचा. दुर्दैवाने तेव्हा या दुष्काळी भागात वर्ष-दोन वर्षे पाऊसच पडायचा नाही. फक्त काळवंडलेले धावणारे ढग तितके दिसायचे. जेव्हा महाराष्ट्र पावसाची आतुरतेने वाट पाहत असायचा, तेव्हा कोकण मात्र पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत असायचे.

एकदा जून महिन्यात कोकणात मृग नक्षत्राला पावसाने हजेरी लावली की, तो सप्टेंबर अखेर अगदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता आणि ऑक्टोबर महिन्यापासून पावसाचा गारवा जाऊन उन्हाच्या झळा सुरू व्हायच्या. भरपूर पडलेल्या पावसाने कोकणातील शेती बहरलेली असायची. श्रावण महिन्यातील सण, गणेशोत्सवातील गणपती विसर्जनानंतर येणारी दिवाळीची पहाटच शेतकऱ्यांसाठी आनंद आणि सुखाची नांदी घेऊन यायची. शेतातील भातपीक तयार झालेले असायचे. एकीकडे शहरी भागात राहणारे दिवाळीच्या फराळात व्यस्त असताना, कोकणातील शेतकरी मात्र त्याच्या शेतातील भातशेती कापण्यात गुंतलेला असायचा. त्याकाळी पाऊस येतच नव्हता असं नाही; परंतु परतीच्या पावसाची एखादी-दुसरी सर केवळ हजेरीपुरती असायची. भात कापणीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ व्हायची अगदीच नाही असं नाही; परंतु त्याचे फार काही शेतकऱ्याला वाटायचे नाही, कारण पाऊस आला म्हणेपर्यंत पावसाने उघडीप घेतलेली असायची.

परंतु दुर्दैवाने यावर्षी मात्र, “अवंधू भात बरा व्हता. मॉप तांदूळ झालो आसतो. पण या पावसावर वशाडी इली ना. हातातोंडाक गावणारो घास या पावसाच्या उच्छादान नाय करून टाकल्यान” हा संवाद अवघ्या कोकणातील पालघरपासून बांद्यापर्यंत सध्या कानावर येतोय. त्याचे कारणही तसेच घडले आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिना म्हटला की उष्णतेच्या झळा सोसाव्या लागायच्या. 'ऑक्टोबर हीट' हा शब्द कानी पडायचा; परंतु यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जून-जुलै महिन्यात कोसळावा तसा पाऊस कोसळत आहे.

एकतर कोकणात अनेक कारणांनी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. भातशेतीचे असणारे क्षेत्र, कोकणातील भाऊबंदकीत शेतीची झालेली वाटणी आणि वाट्याला कमी क्षेत्र आल्याने 'कशाला भातशेती करायची' म्हणून काहींनी भातशेती सोडली, तर काहींच्या मते शेतात राबणारे कुटुंबातील हातच कमी झालेत, मग शेतात कोण राबणार? 'भातशेती परवडत नाही, भातशेतीत काम करायला मजूर मिळत नाहीत,' असा काहींचा सूर आहे; परंतु काहींच्या मते भातपिकातून चांगली कमाई देखील होऊ शकते, मात्र यासाठी फार कष्ट आहेत.

यावर्षी नोव्हेंबर महिना उजाडला, तरीही पाऊस काही थांबत नाही आहे. कोकणातील शेतकरी भातशेती कापताना डोळ्यांत जरूर पाणी आणतो; परंतु त्याचे फोटो किंवा व्हिडीओ तो करत नाही. जो निसर्गाने निर्माण केलेला प्रसंग आहे, त्याला सामोरे जाण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करतो. यावर्षीच्या पावसाने शेतीचा हा हंगामच बिघडवला आहे. कोकणातील अनेक भागात आजही पाऊस कोसळत असल्याने भातकापणी सध्या भर पावसातच होत आहे. यामुळे भातकापणीनंतर गुरांना लागणारे गवतही पावसामुळे खराब होणार आहे. यामुळे कोकणातील शेतकरी खऱ्या अर्थाने चिंतेत आहे. काही गावांतून शेतात फूटभराचे पाणी आहे. या पावसाच्या पाण्यातही भातकापणी अशाच पाण्यात झाल्याने भातपीक किती हाती येईल, हे सांगता येणे अवघड झाले आहे.

रायगड जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. भातपीक घेणारा हा भाग आहे. पूर्वीपासूनच भातशेतीत रायगड जिल्हा अग्रभागी असतो. आजही रायगडमध्ये भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; परंतु सर्वत्रच पाऊस दररोज कोसळत असल्याने भातकापणी करणेही अवघड झाले आहे. पूर्वी नोव्हेंबर महिन्यात कधीतरी अवकाळी पाऊस यायचा; परंतु आता तर दररोज न चुकता दिवसभर पाऊस पडतो. यामुळे भातकापणीचे काम होऊ शकलेले नाही. कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील कोकण कृषी विद्यापीठाने काही नवीन संकरित भाताची बियाणे तयार केली आहेत. या बियाण्यांचा शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर फायदाही घेऊ लागले आहेत. पारंपारिक भात बियाणे आता जवळपास बंद झाली आहेत. संकरित नव्या भात बियाण्यांची पेरणी करून त्यातून दामदुप्पट उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. काही गावातील तरुण शेतकरी या संकरित भात बियाण्यांची शेतात पेरणी करून चांगले उत्पादन घेत आहेत. या तरुण शेतकऱ्यांच्या माध्यमातून भातशेतीतील बदलाचे चांगले परिणामही कोकणात दिसू लागले आहेत. कमी कष्टात, कमी खर्चात जास्त उत्पादन या संकरित भात बियाण्यातून मिळते, त्याचाच वापर केला जात आहे.

पावसाने भातशेतीचे कोकणातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. भातपीक चांगले आले आहे. या हंगामात भरपूर पाऊस येऊनही भाताचे पीक चांगले आले होते; परंतु भातकापणीच्या हंगामातच पाऊस कोसळत असल्याने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत कोसळणाऱ्या पावसाने भातशेतीचे जसे नुकसान झाले, त्याचबरोबर याचा परिणाम मासेमारीवरही झाला आहे. कोकणात मासेमारीचा कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारा उद्योग आहे. कोकणात कोसळणारा पाऊस आणि कोकणच्या किनाऱ्यावरचे वादळ यामुळे कोकणात मासेमारीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून यलो अलर्ट, रेड अलर्ट अशा हवामान खात्याच्या अंदाजातच गेले काही महिने चालले आहेत. शेती आणि मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारा हा पाऊस कधी थांबतोय, याच प्रतीक्षेत कोकणातील सर्वसामान्य शेतकरी आहे.

- संतोष वायंगणकर

Comments
Add Comment