Monday, November 3, 2025

Jodhpur Accident : धक्कादायक! ट्रेलरला धडकलेल्या बसमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत, जोधपूर हादरले!

Jodhpur Accident : धक्कादायक! ट्रेलरला धडकलेल्या बसमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत, जोधपूर हादरले!

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. हा अपघात फलोदी तालुक्यात झाला, जिथे एका टेम्पो ट्रॅव्हलरने (Tempo Traveller) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो ट्रॅव्हलरचे अक्षरशः तुकडे झाले. या अपघातामुळे टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रेलर पाहिला नाही, आणि याच मानवी चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत व बचावकार्य (Rescue Work) सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य (Rescue Operation) अजूनही सुरू आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

१८ जणांचा बळी, मृतांमध्ये महिला-लहान मुलांचाही समावेश!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांची ही टेम्पो ट्रॅव्हलर बस जोधपूरच्या सूरसागर भागातून बीकानेर जिल्ह्यातील कोलायत तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन परत येत असताना, मतोडाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रेलरला बसची जोरदार धडक बसली. मतोडा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की, बस भरधाव वेगात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ ते ४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि रुग्णवाहिका टीम तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. गॅस कटरच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. जखमी भाविकांना प्राथमिक उपचार देऊन जोधपूरमधील एसएमएस आणि एमडीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी फलोदी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

स्थानिक नागरिकांची प्रशासनाकडे संतप्त मागणी

अपघाताची गंभीरता लक्षात घेता, प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाकडे कठोर मागणी केली आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या अवजड वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी असलेली वाहने अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असल्यामुळे ही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >