Sunday, November 2, 2025
Happy Diwali

“आज चांदणे उन्हात हसले...”

“आज चांदणे उन्हात हसले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

कालीमातेच्या मंदिरात जसे शाक्तपंथीय पुजारी असतात तसे शांत सात्त्विक सरस्वतीदेवीच्या मंदिरात कसे असतात ते माहीत नाही; परंतु स्व. शांताबाई शेळके म्हणजे त्या मंदिरातला एक महत्त्वाचा पुजारीच होता हे नक्की! भजने, भावगीते, भक्तिगीते, प्रेमगीते, द्वंदगीते इथपासून तमाशापटांसाठी रांगड्या मराठीतील लावण्या असे एकही क्षेत्र नाही जिथे शांताबाईंनी आपल्या जबरदस्त लेखणीचा ठसा उमटवला नाही. त्यांची भावगीते आणि सिनेगीते तर मराठीतील अक्षरसाहित्य बनून राहिली आहेत. ‘काटा रुते कुणाला’, ‘गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया’, ‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘जाईन विचारित रानफुला’, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’, ‘वादळवारं सुटलं गं’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’, ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’, अशी कितीतरी गाणी त्यांच्या अद्वितीय योग्यतेची साक्ष देतात!

पुन्हा शांताबाई या सगळ्यापलीकडे जाऊन दशांगुळे उरतातच. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक प्रेमगीतांनी अनेक पिढ्याच्या भावनांना अतिशय सुंदर शब्दांत अभिव्यक्ती दिली. मानवी मनातील अत्यंत नाजूक, लाडिक, भावुक अशा उर्मी अतिशय तरल आणि डौलदार शैलीत व्यक्त कराव्यात त्या शांताबाईनीच. त्या जशा स्त्रीमनाचे अत्यंत आतले तलम पदर उलगडून दाखवीत तितक्याच समर्थपणे त्या तरुण पुरुषाच्या रोमँटिक भावनाही सहज व्यक्त करीत.

‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे गं साजणी ये ना...’ या रोमांटिक ओळी एका स्त्रीने लिहिल्या आहेत हे सांगितल्याशिवाय कळणार नाही किंवा शिवकालीन मराठी सरदाराचा रुबाब दाखवणारे ‘शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती?’ हे गाणे शांताबाई नावाच्या एका कवयित्रीने लिहिले आहे हे अनेकांना खरेही वाटणार नाही. इतका त्यांचा आवाका मोठा होता.

असेच त्यांचे एक गाणे होते १९६१ साली आलेल्या ‘कलंक शोभा’ या ‘चित्र गुंजन’च्या सिनेमात. दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी. कलाकार होते चित्तरंजन कोल्हटकर, सूर्यकांत, सीमा आणि विवेक. एका कॉलेजच्या स्नेहसंमेलनातील कार्यक्रमात सुरू झालेले प्रेम हा सिनेमाचा मुख्य विषय. त्यातले हे प्रेमगीत एकेकाळी रेडिओमुळे प्रत्येक मराठी घरात लोकप्रिय झाले होते. सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी स्वत:च आशाताईंबरोबर गायलेल्या त्या गाण्याचे शब्द होते - ‘आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे! स्वप्नाहून जग सुंदर दिसले, तुझ्यामुळे तुझ्यामुळे.’ प्रेमात पडल्यावर तरुण मनात ‘त्याच्या’ किंवा ‘तिच्या’शिवाय दुसरा विचार, दुसरा चेहरा याला काही जागाच नसते आणि मग त्या तारुण्याच्या उन्मादात निसर्गही अगदी वेगळाच भासू लागतो. निसर्गचक्रही कधी बदलल्यासारखे वाटू लागते. आजूबाजूला जे जे घडते ते आपल्याला अनुकूलच आहे अशी भावना मनात फुलू लागते. आजपासून ६४ वर्षांपूर्वी हा सिनेमा आला तेव्हा प्रियकर प्रेयसीची भेट आजच्याइतकी सहजसुलभ मुळीच नव्हती. दोघांची नुसती नजरभेटसुद्धा किती दुर्मीळ असायची आणि त्या क्षणिक भेटीचीसुद्धा केवढी अपूर्वाई! त्यात आज प्रत्यक्ष भेट झाली, मग काय दोघानांही आनंदाचे पर्वच की ते!

भर दुपारी झालेल्या त्या भेटीत दोघांच्या मनात चक्क चांदणे फुलते. सूर्याचा प्रखर प्रकाश जाणवला नाहीच उलट सगळ्या आसमंतात चंद्राचे शीतलसुंदर चांदणे पडले आहे असाच भास दोघांना होऊ लागला. कारण ही भेट केवढ्या तरी प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच घडत होती.

दोघांच्या मनात ओढ होती, प्रेम होते पण ते अव्यक्तच राहून गेलेले होते. एकमेकांनी मनातल्या भावना परस्परांकडे व्यक्त केलेल्या नव्हत्या. त्यामुळे ही अशी माध्यान्हीची भेटही इतक्या आतुर प्रतीक्षेनंतर झाली होती की पहिल्या भेटीतच प्रेमाचा बांध फुटला, भावनांना पूर आला, शब्द अनावर झाले. सगळे मनातले हितगुज, सगळे गुपित दोघांनी एकमेकाला सांगून टाकले. ‘भाव अंतरी उमलत होते, परि मनोगत मुकेच होते. शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे तुझ्यामुळे! आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे...’

प्रेमात दोघे आपापल्या मनात किती स्वप्ने पाहत असतात. जरी ती स्वप्ने, त्या रोमांचक कल्पना एकमेकाला सांगायची उत्सुकता दाबून ठेवावी लागत असली तरी मनातल्या मनातच संवाद सुरू असतो, भावी मिलनाच्या कल्पनेने अंगावर रोमांच उमटत असतात. एकापाठोपाठ एक अशी सुखद चित्रे सतत मनात तरळत असतात. प्रेमिक आपल्याच मनाच्या कॅनव्हासवर रोज नवनवी चित्रे रेखाटत असतो. पण भेट झालेली नसल्याने ते मनात चितारलेले विश्व तिला किंवा त्याला दाखवता आलेले नसते. आणि अचानक एक दिवस ती भेट होते. मग काय? सगळा खजिना त्या जिवलगासमोर रिता केला जातो आणि मग उन्हातही चांदणे हसू लागते. ‘परोपरीचे रंग जमविले, स्तब्धच होते तरी कुंचले. रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे तुझ्यामुळे! आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे...’

प्रत्येक तरुण मन आत्ममग्न असते. त्याच्या आत सतत एक गाणे सुरूच असते. म्हणून कवयित्री म्हणते माझ्या हातात वीणा होती. पण माझ्या भावना मी व्यक्त करू शकत नव्हते. मला माझे सूरच सापडले नव्हते. आणि आज तू भेटलास! त्या तुझ्या भेटीने सगळे चित्रच पालटले. मनाची गीटार झाली. तिच्या तारा आपोआप झंकारू लागल्या. हा सगळा तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. आजवर झालेली मनाची कोंडी सुटली. आतला निर्मळ प्रेमाचा झरा खळखळ वाहू लागला. ‘करांत माझ्या होती वीणा, आली नव्हती जाग सुरांना. तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे तुझ्यामुळे! आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे...’

प्रेमिक म्हणतो माझे हृद्य एखाद्या मंदिरासारखे पवित्र होते. त्यात आधीपासून तुझीच मूर्ती वसत होती पण तुझ्या भेटीची काहीच श्वाश्वती नसल्याने मनात निराशेचा अंधार दाटलेला असायचा. शेवटी आज माझे स्वप्न साकार झाले. तुझे दर्शन झाले, तुझी भेट झाली आणि तो निराशेचा अंधार तर गेलाच पण मनात आनंदाचे दिवे उजळले. हे फक्त तुझ्यामुळे झाले- ‘हृदयमंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भवती. आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे तुझ्यामुळे! आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे. स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे... असे हे जुने भाबडे प्रेम, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणारी ती ‘भेटीची मोठी तुष्टता’ ‘आणि प्रेममंदिरात होणारी भावनांच्या दिव्यांची रोषणाई पाहायची असले तर अशा जुन्या गाण्यांना पर्याय नाही हेच खरे.

Comments
Add Comment