 
                            जनतेच्या कामाचा तत्काळ निपटारा करा : खासदार नारायण राणे
रत्नागिरी : अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचा तत्काळ निपटारा केला पाहिजे. 'उद्या या, परवा या' असे न करता काम कसे पूर्ण करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. 'पेंडिंग' हा शब्दच असता कामा नये. अधिकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते नक्की जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी-सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी येथे केले.
खा. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन मंडळ सभागृहात गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, भाजप पदाधिकारी, पोलीस प्रशासन व अन्य अधिकारी उपस्थित होते.
खा. राणे म्हणाले, रत्नागिरीतील जनता दरबारात १०५ निवेदने प्राप्त झाली. या सर्व निवेदनांची मी दखल घेतली. काहींच्या निवेदनावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले, काही निवेदनांबाबत संबंधित विभागांकडे पुढील पंधरा दिवसांत कार्यवाही करून अहवाल पाठवा, असे निर्देश दिले आहेत.
जनता दरबारातील उपस्थित प्रश्नांचा पाठपुरावा करून सर्व प्रश्न सोडवणार, सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने झाली पाहिजे, केंद्र व राज्य शासनाची निगडित असलेले प्रश्न सोडविले जातील. मी लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासन व जनतेतील दुवा म्हणून काम करणार आहे. लोक भरभरून प्रेम करतात; म्हणूनच चिपळूण, देवरुख आणि आज रत्नागिरीच्या जनता दरबारात हजेरी लावली आणि आपले प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडवणे आपले कर्तव्य आहे. निश्चितच ते सोडवू, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

 
     
    




