 
                            मुंबई : मागील काही वर्षात मराठी चित्रपटांची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. नुकताच 'नाळ २' या सिनेमाला आणि सिनेमातील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आता "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या मराठी चित्रपटाची निवड ही मुंबई गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील "फिल्म बाजार" विभागासाठी झाली आहे.
मुंबई गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार या विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा "फिल्म बाजार - २०२५ साठी "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. अशी घोषणा महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालक स्वाती म्हसे यांनी केली आहे.
किमया प्रॉडक्शनचे महेश कुमार जयस्वाल, कीर्ती जयस्वाल यांनी "मुक्काम पोस्ट देवाचं घर " या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संकेत माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे . या चित्रपटाची कथा ही एका लहान वयाच्या ग्रामीण मुलीभोवती फिरणारी आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईने मुलीला सांगितल्यावर देवाचं घर म्हणजे काय ? ते कुठे असतं ? याच शोध सुरू होतो. त्याचबरोबर तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचे पेन्शन (निवृत्ती वेतन) मिळवण्यासाठी संघर्ष करत असते. चित्रपटाला भावनांची किनार आहे. कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केली आहे. या चित्रपटात बालकलार मायरा वायकुळ हिने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय स्पृहा परब, मंगेश देसाई, कल्याणी मुल्ये, उषा नाडकर्णी आणि प्रथमेश परब या कलाकारांच्या सुद्धा भूमिका आहेत.

 
     
    




