 
                            कर्जत : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत - सीएसएमटी (मुंबई सीएसएमटी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) मार्गावरील लोकलसेवा कोलमडली आहे. वांगणी आणि शेलू दरम्यान एक मालगाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे. यामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लोकल रखडल्या आहेत.
आज शुक्रवार आहे. कामकाजाचा दिवस आहे आणि गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनांवर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांचा सकाळीच खोळंबा झाला आहे. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी विलंब होत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत मध्य रेल्वे ही सर्वात मोठी लोकल सेवा आहे. यात मध्य रेल्वे मुख्य मार्ग तसेच मध्य रेल्वे हार्बर मार्ग, मध्य रेल्वे ट्रान्स हार्बर मार्ग, मध्य रेल्वे नेरुळ - उरण मार्ग हे येतात. मध्य रेल्वेच्या १८१० फेऱ्यांमधून दररोज सुमारे ४० लाख नागरिक घर ते कामाचे ठिकाणी असा प्रवास करतात. सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी असते. यामुळेच गर्दीच्या वेळी कर्जत - सीएसएमटी मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत.

 
     
    




