Thursday, October 30, 2025
Happy Diwali

राज्यातील शाळांमध्ये वंदे मातरम् या संपूर्ण गीताचे गायन

राज्यातील शाळांमध्ये वंदे मातरम् या संपूर्ण गीताचे गायन

‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारचे निर्देश

पुणे : देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये वंदे मातरम् या गीताच्या सर्व कडव्यांचे गायन, गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना या संदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाला पत्र देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळांना सध्या दिवाळीची सुटी संपून ३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. तर, सीबीएसई, आयसीईएसई अशा अन्य मंडळांशी संलग्न शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळांमध्ये उपक्रम आयोजित करावा लागणार आहे.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला, दैनंदिन वापरातील ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, १५० वर्षपूर्तीचे औचित्याने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’चे गायन होण्याबाबत, तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment