Thursday, October 30, 2025
Happy Diwali

इंदापूर-कशेडी दरम्यान ९ महिन्यांत ३६ जणांचा मृत्यू

इंदापूर-कशेडी दरम्यान  ९ महिन्यांत ३६ जणांचा मृत्यू

मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाचा फटका

अलिबाग  : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाचा फटका म्हणून कोकणात जाणाऱ्या एकमेव मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर मागील नऊ महिन्यात इंदापूर ते कशेडी बोगदापर्यंतच्या पट्टयात वाहनांच्या झालेल्या अपघातात ३६ जण मृत्युमुखी पडले.

कोकणात जाणारा एकमेव मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग असून, तब्बल १८ वर्षे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही रखडलेले आहे. या महामार्गाचे काम पूर्णत्वास जाण्यास अजून दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे दरवर्षी डिसेंबरअखेर हा महामार्ग पूर्ण होईल असे सांगत आहेत. दरम्यान या महामार्गावर कामांची स्थिती पाहता अजून दोन वर्षे तरी हा महामार्ग पूर्ण होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर ते कशेडी बोगदापर्यंतच्या ७० किलोमीटरच्या पट्ट्यात १ जानेवारी ते सप्टेंबर अखेर या ९ महिन्याच्या कालावधीत ६९ अपघात झाले. यामध्ये ३६ प्रवासी मृत्युमुखी पडले, तर ७९ प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले. २८ प्रवाशांना मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या, तर ४२ प्रवासी किरकोळरीत्या जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक रामचंद्र ढाकणे यांनी दिली.

प्रवाशांकडून ७५ लाखाचा दंड वसूल

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी बोगद्यापर्यंतच्या ७० किलोमीटरच्या अंतरामध्ये वेगाने वाहने चालवणे, वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे, वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे, यासारख्या प्रकरणांमध्ये ६ हजार १५४ केसेस वाहन चालकांवर दाखल केल्या आहेत. यामध्ये ७४ लाख ९८ हजार ४५० रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी ५ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा दंड जमा झाला, तर ६९ हजार ४२० रुपये दंड वाहन चालकांकडून अद्याप जमा झालेला नाही, अशी माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

Comments
Add Comment