मुंबई : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी. गुकेशने शांत पण कुशाग्र खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने केवळ फेरीच जिंकली नाही, तर काही आठवड्यांपूर्वी हिकारू नाकामुराने केलेल्या वादग्रस्त कृतीला पटावरूनच आपल्या कुशाग्र खेळीने सडेतोड उत्तर दिले.
पहिल्या फेरीत गुकेशला मॅग्नस कार्लसनकडून १.५-०.५ असा पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या फेरीत त्याने नाकामुराला १.५-०.५ तर तिसऱ्या फेरीत फॅबियानो कारुआनाला २-० ने पराभूत करत दमदार पुनरागमन केलं. दिवसअखेर गुकेश ४/६ गुणांसह आघाडीवर असून, त्याच्या मागोमाग कार्लसन (३.५), नाकामुरा (३) आणि कारुआना (१.५) अशी गुणतालिका आहे. या स्पर्धेचा सर्वाधिक चर्चेचा क्षण म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच्या प्रदर्शनीय सामन्यात नाकामुराने गुकेशचा पराभव केल्यानंतर रागाच्या भरात त्याचा राजा प्रेक्षकांमध्ये फेकला होता. त्या घटनेवरून मोठा वाद उसळला होता.






