शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार
अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ केल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कवाढीचा परत एकदा फटका बसणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही सलग चौथ्यावर्षी शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे शुल्कवाढीमुळे पालकवर्गात नाराजीचा सूर आहे.
मागीलवर्षी शिक्षण मंडळाने शुल्कवाढ केली होती. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मार्च २०२५ मध्येच १२ टक्क्यांनी शुल्कवाढ केली होती. आता पुन्हा मार्च २०२६ साठी वाढ लागू केली आहे. एवढेच नव्हेतर प्रमाणपत्रे, गुणपत्रक लॅमिनेशन व इतर बाबींसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार असल्याने पालकांच्या खिशावर आर्थिक ताण येणार आहे. शिक्षण मंडळाने प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व परीक्षा संचालनाशी संबंधित खर्च वाढल्याचे कारण दिलेले असले, तरी प्रत्यक्ष हा भार पालकांनाच पेलावा लागणार आहे. दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी आधी ४७० रुपये असलेले शुल्क आता थेट ५२० रुपयांवर नेण्यात आले आहे, तर इयत्ता बारावी परीक्षेचे शुल्क ४९० वरून ५४० रुपये करण्यात आले आहे.






