Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. यात लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव आणि पर्णका या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षा ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांचे ऑडिट पूर्ण झाले असून उर्वरीत दोन समु्द्रकिनाऱ्यांचे ऑडीट लवकरच पूर्ण होणार आहे.

'ब्ल्यू फ्लॅग'च्या अंतिम नामांकनासाठी या पाचही समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यानुसार काही दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील तीन समुद्रकिनाऱ्यांचे ऑडीट झाले आहे. उर्वरीत दोन समुद्रकिनाऱ्यांपैकी नागाव समुद्रकिनाऱ्याचे ऑडीट कालपासून (२७ ऑक्टोबर) सुरू करण्यात आले आहे. तर ३० ऑक्टोबरपासून पर्णका (डहाणू ) या समुद्रकिनाऱ्याचे सुरक्षा ऑडिट सुरू केले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

सुरक्षा ऑडिटमध्ये या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येते. यात प्रामुख्याने सेफ स्विमिंग झोन निश्चित करून त्यांचे मार्किंग करण्याचे काम केले जाते. याशिवाय या समुद्रकिनाऱ्यांवर पुरेशा जीवरक्षकांची नेमणूक करणे, समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा आहेत का? या बाबी तपासण्यात येतात.

'ब्लू फ्लॅग' म्हणजे काय? जे समुद्रकिनारे पर्यावरणाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि सौंदर्याने नटलेले असतात. तसेच, पर्यटनासाठी विशेष असतात अशा समुद्रकिनाऱ्यांची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाते. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त ब्लू फ्लॅग हे मानक दिले जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा