मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम राबवित आहे. बँक येत्या काही महिन्यांत सुमारे ३,५०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य विकास अधिकारी किशोर कुमार पोलुदासू यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने जून महिन्यात ५०५ प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) ची भरती पूर्ण केली असून तितक्याच पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. तसेच, १,३०० आयटी आणि सायबरसुरक्षा तज्ज्ञ अधिकारी यांची निवड आधीच करण्यात आली आहे. आणखी ५४१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडते, प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मानसोपचार चाचणीसह मुलाखत असेल.
याशिवाय, पोलुदासू यांनी सांगितले की सुमारे ३,००० मंडळ आधारित अधिकाऱ्यांच्या भरतीचा विचार सध्या सुरू असून हे सर्व काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
बँकेचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी यांनी याआधी सांगितले होते की, चालू आर्थिक वर्षात विविध श्रेणींमध्ये एकूण १८,००० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी सुमारे १३,५०० लिपिक पदे, तर उर्वरित प्रोबेशनरी अधिकारी आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी असतील.
महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबत बोलताना पोलुदासू म्हणाले की, एसबीआयने पाच वर्षांत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास ३३ टक्के आहे, तर एकूण कर्मचाऱ्यांमध्ये २७ टक्के आहे.
त्यांनी सांगितले की, बँक महिलांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यावर भर देत आहे. एसबीआय ‘एम्पॉवर हर’ सारख्या उपक्रमांद्वारे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत असून, पाळणाघर भत्ता, ‘फॅमिली कनेक्ट’ कार्यक्रम, तसेच प्रसूती किंवा दीर्घ रजेवरून परतणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहे.
सध्या एसबीआयमध्ये २.४ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून ती देशातील सर्वात मोठी नियोक्ता संस्था म्हणून ओळखली जाते. बँकेचे उद्दिष्ट आहे की, महिलांना सर्व स्तरांवर संधी देऊन एक संतुलित, समावेशक आणि प्रेरणादायी कार्यसंस्कृती विकसित करणे, हे बँकेचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.






