Monday, October 27, 2025
Happy Diwali

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध केले आहे. या फूटेजमध्ये दिसणारा संशयित अंदाजे ३० वर्षांचा असून गोऱ्या वर्णाचा दिसत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वंशद्वेषातून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी वेस्ट मिडलँड्स येथील पार्क हॉल परिसरात रस्त्यावर एका त्रस्त तरुणीला पाहून नागरिकांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत एका अनोळखी व्यक्तीने जवळच्या घरात नेऊन तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला असल्याचे उघड झाले. दरम्यान, पोलिसांचे विशेष पथक आणि फॉरेन्सिक टीम याप्रकरणातील इतर पुरावे गोळा करत आहेत.

“जर कुणी संशयास्पद व्यक्ती पाहिली असेल किंवा कोणाकडे डॅशकॅम अथवा सीसीटीव्ही फूटेज असेल, तर कृपया पोलिसांशी संपर्क साधा,” असे आवाहन वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी केले आहे. तसेच “हा अतिशय भयंकर प्रकार आहे. दोषी व्यक्तीला पकडण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत,” असे डिटेक्टिव्ह सुपरिटेंडंट रोनन टायर यांनी सांगितले.

परिसरातील स्थानिकांनी सांगितल्यानुसार, पीडित तरुणी पंजाबी वंशाची आहे. मागच्या महिन्यातही जवळच्याच ओल्डबरी भागात एका ब्रिटिश शीख महिलेवर अशाच प्रकारचा हल्ल्या करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे महिनाभरानंतर झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment