Sunday, October 26, 2025
Happy Diwali

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. तर १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. या तिन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध होईल. १७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे, तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी घेण्यात येईल. दोन्ही निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे. तसेच ३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२७ मध्ये जाहीर केला जाणार आहे. तसेच १५ नोव्हेंबर रोजी विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ होऊन फेब्रुवारी २०२७ मध्ये निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. याच प्रमाणे १५ नोव्हेंबर रोजीच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल मार्च २०२७ मध्ये जाहीर केला जाणार आहे.

वेळापत्रकानुसार, २१ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२६, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे, तर निकाल मार्च २०२७मध्ये जाहीर केला जाणार आहे. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल एप्रिल २०२७मध्ये जाहीर करण्यात येणार आहे, असे 'एमपीएससी' कडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment