पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या महासागरात दरवर्षी भाविकांनी भरून जाणाऱ्या पंढरपूर नगरीत यंदाच्या कार्तिकी यात्रेचा लवकरच प्रारंभ होत आहे. यात्रेच्या काळात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून विशेष धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे. विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे, आणि आता भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल मूर्तीच्या पाठीशी "लोड" तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी "तक्क्या" ठेवण्यात आले आहे. या पारंपरिक विधीनंतर आता विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन अखंड सुरू राहणार आहे. यावेळी काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती या राजोपचारांना तात्पुरता विराम देण्यात आला असून, नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. भाविकांना हे अखंड दर्शन ९ नोव्हेंबर म्हणजेच प्रक्षाळपूजेपर्यंत पर्यंत मिळणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी आणि दर्शनरांगा जलदगतीने पुढे सरकाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या आहेत. परंपरेनुसार पलंग काढल्यानंतर श्रींचे २४ तास मुखदर्शन व २२.१५ तास चरणदर्शन उपलब्ध असते. तसेच मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून आणि विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी पडद्यांद्वारे लाईव्ह दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
यात्रेच्या काळात सर्व व्हीआयपी दर्शन आणि खास पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत. श्रींच्या परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी काटेकोरपणे पार पाडले जात असून, पलंग काढणे, एकादशी पूजन, महानैवेद्य, पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला व प्रक्षाळपूजा या विधींचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती समितीकडून देण्यात आली आहे.
मागील आषाढी यात्रेतील अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या कार्तिकी यात्रेचे नियोजन अधिक सुयोग्यपणे करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समिती, स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत.






