मुंबई : बिझनेस सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केल्यानंतर आता झोहो कंपनी डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात उतरली आहे. गूगल पे (G Pay), पेटीएम (PayTM) आणि फोनपे (Phone Pay) सारख्या मोठ्या अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी झोहो लवकरच झोहो पे हे नवे अॅप लाँच करणार आहे. विशेष म्हणजे हे केवळ स्वतंत्र अॅप नसेल, तर झोहोच्या मेसेजिंग अॅप अरत्ताईमध्येही समाविष्ट असेल. म्हणजे चॅट करताना अॅप बदलण्याची गरज न पडता पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य होईल.
झोहो पेमेंट्स टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवरामकृष्णन ईश्वरन यांनी सांगितले की, सोपे, सुरक्षित आणि निर्वेध व्यवहार करणे हे झोहो पे चे प्रमुख उद्दिष्ट आहे. अरत्ताईमध्ये पेमेंट फीचर समाविष्ट केल्याने युझर्सना अधिक सुलभ अनुभव मिळेल. झोहो आधीपासूनच व्यावसायिक देयके आणि पॉईंट-ऑफ-सेल सोल्युशन्स पुरवते. आता कंपनी फिन्टेक क्षेत्रात आणखी विस्तार करत असून, पेमेंट्ससोबतच लेंडिंग, इन्शुरन्स, ब्रोकिंग आणि वेल्थटेक सेवाही देण्याची योजना आहे.
याशिवाय, झोहो झोहो बिलिंग नावाचे नवे इनव्हॉइसिंग आणि सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट टूल आणि झोहो पेरोल सिस्टीम बँकांशी जोडण्याचे काम करत आहे. त्यामुळे लहान व्यवसायांना पेमेंट, कॅश फ्लो आणि पेरोल व्यवस्थापन एकाच प्लॅटफॉर्मवर करता येईल.
२०२१ मध्ये लाँच झालेल्या अरत्ताई अॅपचा मुख्य भर डेटा गोपनीयतेवर आहे. त्यातच झोहो पेचे एकत्रीकरण हे नैसर्गिक पाऊल ठरणार आहे. सध्या झोहो पे अंतर्गत चाचणी टप्प्यात असून, येत्या काही महिन्यांत ते टप्प्याटप्प्याने लाँच केले जाईल.
भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात आधीपासूनच गुगल पे, फोनपे आणि पेटीएमचे वर्चस्व असले तरी झोहोच्या एन्ट्रीमुळे या क्षेत्रात नवे वळण येईल. विशेषतः अरत्ताईमधील चॅट-पेमेंट फीचर लहान व्यावसायिकांसाठी मोठी सोय ठरेल आणि गोपनीयतेवर लक्ष देणाऱ्या वापरकर्त्यांचा विश्वास झोहोकडे वाढवेल.






