नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन दिग्दर्शकांना आवडले. त्यामुळे एकाच नावाचे ३ सिनेमा होऊन गेले. पहिल्या गुमराहमध्ये(१९६३) होते अशोककुमार, माला सिन्हा आणि सुनील दत्त. महेश भट यांचा दुसरा गुमराह आला १९९३ साली श्रीदेवी आणि संजय दत्तला घेऊन. वर्धन केतकर यांचा २०२३ चा गुमराह तर तमिळ सिनेमा ‘थाडम’चा रिमेक होता आणि त्यात मृणाल ठाकूरबरोबर आदित्य रॉय कपूरचा डबल रोल आणि सोबत होता राहुल रॉय.
बी.आर.चोपडांच्या गुमराहमध्ये कथेलाही महत्त्व होते आणि संगीतालाही. त्यातली साहीरची गाणी एकापेक्षा एक आहेत. प्रत्येक प्रसंगावर आणि प्रत्येक गाण्यावर एक लेख लिहावा इतकी ती अर्थपूर्ण आणि सुंदर आहेत. त्यात पुन्हा रवीचे कर्णमधुर संगीत! सगळी भट्टीच जबरदस्त जमलेली.
चित्रपटात शशिकलाने (लीला नावाचे पात्र) नकारात्मक भूमिका केली होती. ती माला सिंन्हाला आपण राजेंद्रची पत्नी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करत असते. पण गंमत म्हणजे या नकारात्मक भूमिकेसाठी तिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. चित्रपटात फिल्मफेयर मिळालेली ती एकमेव अभिनेत्री ठरली. दुसरे फिल्मफेयर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून मिळाले ते महेंद्र कपूरला (चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो). खरे तर याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून साहीरसाहेबांचे नामांकनही झाले होते.
मीना (माला सिन्हा) आणि कमला (निरुपा रॉय) श्रीमंत पित्याच्या दोन कन्या. कमलाचे पती आहेत बॅरिस्टर अशोक (अशोककुमार), तर मीना एक गायक कलाकार राजेंद्रच्या (सुनील दत्त) प्रेमात आहे. कमलाची या प्रेमाला संमतीही आहे तिला दोघांचे लग्न लावून द्यायचे आहे. पण अचानक तिचाच मृत्यू होतो आणि कथा शोकांत होऊ लागते. बहिणीच्या मुलांना सावत्र आईचा त्रास अनुभवावा लागू नये म्हणून माला सिन्हाला अशोककुमारशी लग्न करावे लागते. एक दिवस सुनील दत्तची कथेत अचानक पुन्हा एन्ट्री होते आणि जुने प्रेम दोघांना अस्वस्थ करून सोडते. इथे कथा एक वेगळे वळण घेते.
साहीरसाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाच्या कथेतील प्रसंग कितीही नाट्यमय असला, त्यात कितीही भावनिक गुंतागुंत असली तरी ते सगळे एका सुंदर गाण्यात उतरवणे ते लीलया करत.
कथेच्या त्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर साहीरसाहेबांनी एक अजरामर गीत लिहिले. महेंद्रकपूरच्या खास पहाडी आवाजातले ते ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’ कोणताही रसिक कधीच विसरू शकणार नाही. असेच ‘आप आये तो खयाले दिले नाशाद आया, कितने भुले हुवे जखमोका पता याद आया.’ हे साहीरसाहेबांच्या लेखणीतून आणि महेंद्रकपूरच्या गळ्यातून उतरलेले गाणे उत्कृष्ट शायरीचा एक सुंदर नमुनाच होते.
मीना आणि राजेंद्रमधील सुरुवातीच्या प्रेमाच्या ऐन बहरातले आशाताई आणि महेंद्रकपूरने गायलेले गाणे म्हणजे एक आगळा आनंद आहे. प्रेमाच्या ऐन भरात असलेला देखणा सुनील दत्त आणि मुग्धसुंदर माला सिन्हाच्या तोंडी साहीरसाहेबांचे शब्द होते-‘इन हवाओंमें, इन फिजाओंमें तुझको मेरा प्यार पुकारे, आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पुकारे.’ निसर्गरम्य परिसरात चित्रित झालेल्या या गाण्यात आशाताईंनी माला सिन्हाला खास लाडीक आवाज दिला होता. सुनील दत्तच्या प्रियाराधनाच्या निमंत्रणावर ती म्हणते, तू बोलावल्यावर मला तरी कुठे स्वत:ला आवरता येते. मीही धावत सुटतेच ना! - ‘रूक ना पाऊं मैं, खिचती आऊं मैं, दिलको जब दिलदार पुकारे, आजा आजा रे तुझको मेरा पुकारे.’ ऐन तारुण्यातले प्रेम वेडेच असते. प्रेमाच्या त्या उत्कट अवस्थेत प्रत्येक प्रेमिकाला जीवनातला सर्व आनंद, जगातली सर्व सुंदरता जाणवते ती केवळ आपल्या प्रियतमेच्या उपस्थितीमुळेच! म्हणून तो म्हणतो, तुझ्यामुळेच मला या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यातली धुंदी, फुलांतले मोहक रंग जाणवतात. मीनाही त्याच मन:स्थितीत आहे, ती म्हणते, माझे तर अवघे अस्तित्वच तुझ्यामुळे सतत झुल्यावर झुलत राहते. तुझ्या दोन बाहूंचे आमंत्रण माझ्या मनातल्या कितीतरी सुप्त इच्छा जाग्या करते - ‘तुझसे रंगत, तुझसे मस्ती इन झरनोमें, इन फूलोंमें, तेरे दमसे मेरी हस्ती झूले चाहतके झूलोंमें, मचली जायें शोख उमंगे, दो बाहोंका हार पुकारे, आजा आजा रे...’ दोघे एकमेकांला त्याचे आपल्या जीवनातले महत्त्वाचे स्थान पुन्हा पुन्हा सांगू इच्छितात. प्रेमाच्या त्या वळणावर आपल्या जिवलगाला कुठे ठेवू आणि कुठे नको असे दोघानांही झालेले असते. एकाच्या हृदयातल्या धडधडीवर दुसऱ्याचे हृदय धडकते आहे असे वाटते. तिच्या डोळ्यांत पाहिले की मनावर जादूच होऊन जाते. ओठाजवळ ओठ आले की तिच्या श्वासाची कस्तुरी त्याला धुंद करते. तिला तरी कुठे संयम धरता येतो. ती म्हणते माझ्या केसातील एकेक बटा जणू तिला कैद करायला आतुर झाली आहे. माझ्या पदरातील एकेक धागा तुलाच बोलावतो आहे. ‘दिलमें तेरे दिलकी धड़कन, आँखमें तेरी आँखका जादु, लबपर तेरे लबके साये, साँसमें तेरी साँसकी खुशबू, जुल्फोंकां हर पेंच बुलाये, आँचलका हर तार पुकारे, आजा आजा रे..’ दोघे एका अनावर मनस्थितीत आहेत. यालाच जुनून म्हणजे प्रेमाचा उन्माद म्हणतात. ते म्हणतात जीवनातल्या वाटेल त्या समस्या आमच्या शिरावर येऊन आदळल्या तरी चालतील पण आता ही मधुर संगत कधीच सुटायला नको. शरीरातून प्राण निघून गेले तरी चालतील पण माझ्या हातातून तुझा हात सुटू नये. आता मागे वळून पाहणे नाहीच. सगळ्या जगाने जरी परत बोलावले तरी आता आम्हाला काहीच नको, फक्त एकमेकाची ही अतूट सोबत हवीये. लाख बलाये सरपर टूटे, अब ये सुहाना साथ ना छुटे, तनसे चाहे जां छुट जाये, हाथसे तेरा हाथ ना छुटे, मूडके तकना ठीक नही हैं, अब चाहे संसार पुकारे. आज पाश्चिमात्य संस्कृतीच्या झंजावातामुळे सिनेमातलीच नाही तर प्रत्यक्ष जगण्यातीली बहुतेक नाती खिळखिळी, उसवलेली आणि तकलादू होत चालली असताना काहीतरी खरे, बावनकशी, शाश्वत अनुभवायचे असेल तर जुन्या सिनेमांना आणि जुन्या गाण्यांना पर्याय नाही ! म्हणून तर हा ‘नॉस्टॅल्जिया’!






