पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेचा पदाधिकारी नकुल आनंद भोईर (वय ४०) याचा त्याच्या पत्नीनेच कापडाने गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना भोईर कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैताली नकुल भोईर (वय २८) हिला तात्काळ अटक करण्यात आली असून तिला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, नकुल भोईर पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत चालले होते. गुरुवारी रात्री दोघे आरोग्य केंद्राच्या इमारतीत बोलत असताना पुन्हा भांडण झाले आणि संतापाच्या भरात चैतालीने नकुलचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर तिने स्वतःच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.
चैतालीला अटक झाली त्या वेळी तिची दोन आणि पाच वर्षांची मुलं घरी झोपलेली होती. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नकुल भोईरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
नकुल भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) कार्यकर्ता होता आणि चिंचवड परिसरात त्याचा मोठा जनसंपर्क होता. तो आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. त्याची पत्नी चैताली हीदेखील समाजसेवेमध्ये सक्रिय होती आणि भविष्यात नगरसेविका होण्याची तिची इच्छा होती. दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.






