Saturday, October 25, 2025
Happy Diwali

प्रतिष्ठा महिलांच्या हाती

प्रतिष्ठा महिलांच्या हाती

क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) एक वेगळेच वलय आहे. सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट मंडळ असा बीसीसीआयचा जगभरात नावलौकिक आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये सुरुवातीपासूनच अनेक नावलौकिक प्राप्त खेळाडूंचा समावेश राहिला आहे. क्रिकेट खेळातील अनेक विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत. अन्य देशातील क्रिकेट खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडूंना मिळणारे मानधन अधिक आहे. पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला संघांच्या मानधनामध्ये विषमता होती. पण बीसीसीआयची सूत्रे जय शहा यांच्याकडे गेल्यानंतर बीसीसीआयचा चेहरा-मोहरा बदलण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. महिला क्रिकेटपटूंनाही आता पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने मानधन मिळण्यास सुरुवात झाल्याने मानधनातील दुजाभाव संपुष्टात आला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघामध्ये मागील अनेक वर्षांपासून एकाहून एक अशा अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश राहिलेला आहे व आजही भारतीय क्रिकेट पुरुष संघामध्ये समावेश होण्यासाठी कमालीची चुरस निर्माण झालेली आहे. अनेक दर्जेदार, गुणवंत खेळाडू खेळाचा क्लास असताना व दर्जांमध्ये सातत्य असताना प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. एकेकाळी डायना एडल्जी, मिताली राजसारख्या मोजक्याच खेळाडूंमुळे भारतीय महिला क्रिकेटच्या संघाची ओळख असायची, पण अलीकडच्या काळात भारतीय महिला क्रिकेट संघाने कात टाकल्याप्रमाणे प्रगती केली आहे. भारतीय महिला संघाची एक दर्जेदार संघ म्हणून ओळख होत असून एक आक्रमक चेहरा भारतीय महिला क्रिकेट संघाला प्राप्त झाला आहे. अनेक विक्रम भारतीय महिला क्रिकेटर्सच्या खात्यात जमा असून अनेक दिग्गज संघांना सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेटर्सने आपल्या कामगिरीच्या बळावर पाणी पाजले आहे. सध्या भारतीय क्रिकेटमधील पुरुष आणि महिला संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारतीय पुरुष संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची फारशी प्रभावी कामगिरी झालेली नाही. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत सलग दोन सामने भारताला गमवावे लागले असून मालिकाही भारताला गमवावी लागली आहे. विराट कोहली, कर्णधार शुभमन गिल या दिग्गज खेळाडूंच्या फलंदाजीतील अपयशामुळे भारतीयांची चिंता वाढली आहे. गोलंदाजांनाही फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्यांना पराभूत करणे एक अग्निदिव्यच आहे. त्यात फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर २६५ धावांचे रक्षण करणे कोणत्याही संघातील गोलंदाजांसाठी अवघड काम आहे. त्यातल्या त्यात दुसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्माला गवसलेला सूर क्रिकेटप्रेमींना दिलासा देणारी बाब आहे. विराट कोहलीला दोन्ही सामन्यात खाते उघडता आले नाही, तर कर्णधार शुभमन गिलला दोन्ही सामन्यांतील आकडेवारी एकत्रित केली तरी २५च्या पार करता आलेली नाही.

शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी भारत व ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना होत असून मालिकेतील व्हाईट वॉश टाळण्यासाठी व प्रतिष्ठा जपण्यासाठी भारताला अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. त्या तुलनेत महिला भारतीय क्रिकेट संघाची सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी गुरुवारी न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विश्वचषकांचा संभाव्य विजेता म्हणूनही आज भारतीय महिला संघाकडे पाहिले जात आहे. दोनदा उपविजेतेपद आणि तीन वेळा उपांत्य फेरी. आयसीसी महिला विश्वचषकात आजवर विजयाच्या असे जवळ येऊनही भारताला विजेतेपदाचा आनंद साजरा करता आलेला नाही. उपांत्य फेरी व त्यापाठोपाठ फायनलचा सामना जिंकून पण हाच इतिहास बदलण्याची चांगली संधी भारताकडे चालून आलेली आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय महिलांचा प्रवास हा अडथळ्याची मालिका पार करतच झालेला आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील प्रवास चढ-उतारांचा राहिला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध आणि पाकिस्तानविरुद्ध सलग विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्यांना सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरीला न्यूझीलंडविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना ३४० धावांपर्यंत मजल मारली व न्यूझीलंडला पावणेतीनशेच्या घरातच रोखत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विश्वचषक स्पर्धेदरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाने दाखवलेले धैर्य आणि जिद्द कौतुकास्पद आहे. सुरुवातीच्या पराभवानंतरही त्यांनी जोरदार पुनरागमन करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने दाखवलेला आत्मविश्वास पुढील सामन्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांसमोर भारतीय संघाला उपांत्य फेरीत कडवी झुंज द्यावी लागेल. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.आता सर्वांचे लक्ष या उपांत्य सामन्यांकडे लागले आहे, जिथे विश्वविजेतेपदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळेल. भारतीय महिला संघाच्या फलंदाजीने दणकेबाज खेळी करत स्पर्धेमध्ये ३००चा आकडा अनेकदा पार केला आहे. स्मृती मानधनाने खेळीमध्ये दाखविलेल्या सातत्यामुळे मागील तीन सामन्यांमध्ये भारताला चांगली मजल मारणे शक्य झाले. भारतीय क्रिकेट संघाची प्रतिष्ठा आता खऱ्या अर्थाने पणाला लागलेली आहे. पुरुष क्रिकेट संघाला आपली पत राखण्यासाठी आणि एकदिवसीय मालिकेतील व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत. सध्या भारतीय महिला फलंदाजांना गवसलेला सूर पाहता व आक्रमक खेळी पाहता वर्ल्ड कप आता दूर नाही, अशी आशा बाळगायला वाव आहे.

Comments
Add Comment