
नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४ लहान मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकार सावध झाले आहे. आता विक्रीआधी प्रत्येक औषधाची तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने प्रयोगशाळा उभारण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे. या अंतर्गत मध्य प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी करणार आहे.
प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी केंद्राकडून मध्य प्रदेश सरकारने २११ कोटी रुपयांची मदत मागितली आहे. उर्वरित निधीची व्यवस्था मध्य प्रदेश सरकार करणार आहे.
मध्य प्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीआधी औषधांची तपासणी केली जाईल. तज्ज्ञांच्या परवानगी नंतरच संबंधित जिल्ह्यात औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार आहे. सध्या संपूर्ण भारतासाठी विक्रीआधी औषधांची तपासणी करणाऱ्या चार मोठ्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पण या प्रयोगशाळांवर कामाचा प्रचंड ताण आहे. यामुळे मध्य प्रदेश सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेश सरकार उपक्रम राबवत आहे त्याच पद्धतीने देशाती इतर राज्यांनी नियोजन केले तर लवकरच देशातील प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा सुरू होतील. यामुळे सदोष औषधांच्या विक्रीला आळा घालणे शक्य होईल, असा विश्वास सरकारी यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.