
पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांत एसटीच्या सहा हजार फेऱ्या झाल्या असून, अडीच लाख नागरिकांनी प्रवास केला. विशेषतः मराठवाड्यात गेल्या वर्षी तीन दिवसांत ६०० फेऱ्या झाल्या होत्या आणि यावर्षी ३०० फेऱ्यांमध्ये वाढ होऊन एकूण ९०० फेऱ्या एसटीकडून मारण्यात आल्या. तसेच विदर्भातील फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. पुणे एसटीच्या या उपक्रमामुळे पुणे एसटी विभागाला सहा कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे.
नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात शहराबाहेरून राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळी सणाला गावी जाऊन येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे एसटी विभागातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण या सर्व भागात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन दिवस एसटीला प्रचंड गर्दी होती. विशेषतः पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून अधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. याचा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणे विभागासह इतर विभागातील ताफ्यातील बसची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणे विभागातून सर्वाधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर सगळीकडे लालपरीच्या रांगा लागल्या होत्या.