
पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये!
कराची : भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या देशभरातील भाज्यांचे दर कडाडले असले तरी एक किलो भाजीसाठी शंभरच्या आत रुपये मोजावे लागत आहेत. मात्र पाकिस्तानमधील टोमॅटोचा भाव ऐकला तर तुम्हाला धक्का बसेल. पाकिस्तानमध्ये सध्या एक किलो टोमॅटोसाठी ७०० रुपये मोजावे लागत आहेत. यातून अफगाणिस्तानने व्यापाराच्या माध्यमातून पाकिस्तानवर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसते.
पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तानमधील मोक्याच्या शहरांमध्ये टोमॅटोचा भाव आता गगनाला भिडला आहे. सध्या टोमॅटो विक्रमी ७०० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी माणसांचे बजेट पार कोलमडून गेले आहे.
पाकिस्तानच्या अनेक भागांना सध्या अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलेला आहे.त्यामुळे अनेक भागातील पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमेवरील संघर्षामुळे अफगाणिस्तानने टोमॅटोची निर्यात थांबवली आहे. टोमॅटोप्रमाणे इतर भाजीपाला सुद्धा सीमेवरूनच परत पाठवण्यात येत आहे. त्याचा फटका पाकिस्तानमधील अनेक शहरांना बसत आहे.
एका व्यापाऱ्याने समा टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पाकिस्तान सरकारने तातडीने इराणमधील टोमॅटो मागवले आहे. पण इराणवरून टोमॅटो पाकिस्तानमध्ये येईपर्यंत किती ताजे असतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.