Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर कमबॅकचे आव्हान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर कमबॅकचे आव्हान

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा दुसरा मुकाबला ऍडलेड ओव्हल येथे रंगणार आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर यजमान संघ तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. जर टीम इंडियाने हा सामना गमावला तर ते मालिका गमावतील. विजय मिळवल्यास शुभमन गिलचा संघ मालिकेत बरोबरी साधू शकतो. दरम्यान, या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारताने १७ वर्षांत ऍडलेड ओव्हल येथे एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. संघाला सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे.विराट कोहली या मैदानावर प्रत्येक सामन्यात शतक झळकावत आहे. आता कोहली त्याच्या आवडत्या मैदानावर भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऍडलेड ओव्हल हे भारताच्या होमग्राउंडसारखे आहे.

भारतीय संघाने येथे १५ सामने खेळले आहेत. त्यापैकी नऊ जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. याचा अर्थ भारताने येथे त्यांचे ६०% सामने जिंकले आहेत, जे इतर ऑस्ट्रेलियन मैदानांपेक्षा जास्त आहे. या मैदानावर टीम इंडियाचा शेवटचा पराभव १९ फेब्रुवारी २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध झाला होता. भारताला या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे. संघाने येथे मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. कांगारूंनी मागील चार सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांनी या मैदानावर एकूण सहा सामने खेळले आहेत. एकूणच, भारत आणि ऑस्ट्रेलियाने एकूण १५३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी ५८ भारताने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाने ८५ सामने जिंकले. दहा सामने अनिर्णित राहिले. भारताने ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर कांगारूंविरुद्ध ५५ सामने खेळले आहेत, त्यापैकी १४ जिंकले आणि ३९ सामन्यात टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला आहे. विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ५१ सामन्यांमध्ये ५३.२८ च्या सरासरीने २४५१ धावा केल्या आहेत. कोहलीने या मैदानावर 4 सामने खेळले आहेत आणि ६१.०० च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके देखील झळकावली आहेत. म्हणजेच कोहली ऍडलेडमध्ये प्रत्येक दुसऱ्या डावात शतक करतो. रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ४५ सामन्यात ३९ विकेट्स घेतल्या आहेत.

सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघात कर्णधार मिचेल मार्शने भारताविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने २४ सामन्यात ३९.२९ च्या सरासरीने ९४३ धावा केल्या आहेत. मार्शने तीन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. मिचेल स्टार्कने २० सामन्यात भारताकडून ३१ विकेट्स घेतल्या आहेत. ऍडलेडमध्ये सामन्याच्या दिवशी आकाश ढगाळ असणार आहे. पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसामुळे षटके कमी करण्यात आली होती. आणि सामना २६ षटकांचा खेळवण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. ऍडलेड ओव्हलची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल असेल. सुरुवातीला ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असणार आहे. पण खेळ पुढे सरकत असताना फिरकीपटूंना अनुकूल असेल. या मैदानावर एकूण ९४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ४९ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. तर ४३ सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. आता ऍडलेड एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधतो की, ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी आघाडी घेतो याकडेच तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. ---------------

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >