
अमरावती : महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'हिट अँड रन'ची घटना घडली. भरधाव बोलेरो कारने दोन तरुणींना उडवले. या घटनेनंतर चालक कारसह घटनास्थळावरुन फरार झाला. राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, २२ वर्षांची पायल राजेंद्र बुंदेले आणि तिची २१ वर्षांची मैत्रीण वैष्णवी विष्णू थोरात या दोघी रस्त्यावरुन जात होत्या. त्याचवेळी कंवरनगर भागात मागून येणाऱ्या भरधाव पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी अपघात स्थळावरुन पायल आणि वैष्णवीला रुग्णालयात दाखल केले. पायलच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिला असलेला धोका टळला आहे. पण वैष्णवीची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. पोलीस बोलेरो चालकाचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.