
मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्यासाठी मुरुड परिसरातील कोळीबांधव तयारीला लागले. मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. सोडे खरेदीची २५ लाखांची उलाढाल होते.
सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बोंबील, अंबाडी सुकट, पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रेमाने सुकवली व दिवाळीसाठी साठवली. पर्यटकांची चांगली साथ मिळाली तर कोळी आर्थिंक सक्षम होतो. कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनवण्यावर बंधन आहे. कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे की मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रीटचे ग्राउंड पाहिजे. जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम होतो. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. वर्षाला हजारो कोटींची उलाढाल होते. येथील मच्छीमारांचे मासेमारीत कौशल्य बघता यथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचले व मासे परदेशात नेणाऱ्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल.