
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या कर्मचाऱ्यांवर १.६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीत सहभागी असल्याचा आरोप आहे.
गुप्त माहितीनंतर डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने विमानतळावर तैनात असलेल्या काही कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. याच दरम्यान एका सफाई कर्मचाऱ्याच्या संशयास्पद हालचाली अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या. विमानाची साफसफाई झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने एरोब्रिजच्या जिन्यावर धाव घेतली आणि एका कोपऱ्यात एक पॅकेट लपवण्याचा प्रयत्न केला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत ते पॅकेट जप्त केले. त्यामध्ये पांढऱ्या कापडात गुंडाळलेली आणि मेणाच्या रूपात लपवलेली १.२ किलो सोन्याची धूळ आढळली. या सोन्याची किंमत सुमारे १.६ कोटी रुपये आहे.
तपासात उघडकीस आले की, हा कर्मचारी विमानतळावरील सफाई कर्मचाऱ्यांच्या टीम लीडरपदी कार्यरत आहे. त्याने तपासाधिकाऱ्यांना कबूल केले की, ओळख पटू नये म्हणून त्याने हे पॅकेट लपवले होते. पर्यवेक्षकाने सोनं विमानातून बाहेर काढून लपवण्यासाठीच दिले होते, अशी कबुली कर्मचाऱ्याने दिली. ही कबुली मिळताच डीआरआयने त्वरित पर्यवेक्षकालाही ताब्यात घेतले. दोघांनाही सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, हा प्रकार एका आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटचा भाग असून त्यामध्ये परदेशी प्रवाशांचाही सहभाग आहे. प्रवासी विमानातच सोने लपवून ठेवत आणि विमानतळावरील कर्मचारी ते ताब्यात घेऊन गुप्तपणे बाहेर काढत होते.
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, ही घटना विमानतळांवरील अंतर्गत प्रवेश आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाच्या माध्यमातून कशी मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते याचे उदाहरण आहे. अशा प्रकारामुळे केवळ महसुलाचे नुकसान होत नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होतो. सध्या या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू असून, या तस्करी सिंडिकेटमागील परदेशी कनेक्शनचा तपास सुरू आहे.