Sunday, October 19, 2025
Happy Diwali

आरोपी भूषण पतंगेचा उपचारादरम्यान मृत्यू

आरोपी भूषण पतंगेचा उपचारादरम्यान मृत्यू

अलिबाग  : अलिबाग येथील बनावट नोटाप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय आरोपी भूषण पतंगेचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केल्यामुळेच आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे; परंतु, पोलिसांनी हा आरोप खोडून काढत आरोपीला फिट येण्याचा गंभीर आजार असल्याने त्याच्यावर जे. जे. उपचार रुग्णालयात सुरू होते असे म्हटले आहे.

अलिबाग शहरातील भूषण पतंगेच्या घरातून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा लाखो रुपयांचा साठा अलिबाग पोलिसांनी जप्त केला होता. ही कारवाई शुक्रवार ३ ऑक्टोबरदरम्यान अलिबाग करण्यात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली आली होती. पतंगेला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याला फीट येण्याचा गंभीर आजार असून, सीटीस्कॅन करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, नातेवाईकांनी त्याला चौकशीदरम्यान पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच तो दगावल्याचा आरोप केला. भूषणच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे यांच्याकडे होता, तर चौकशीदरम्यान आरोपी भूषण पतंगेची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु पुरेशी यंत्रणा नसल्याने त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Comments
Add Comment