
पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२ वर्षांचे आजोबा निवडणूक लढवत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांना जे जमले नाही ते काम करणार, मतदारसंघाचा विकास करणार असे आश्वासन देत राम स्वार्थ प्रसाद यांनी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले आहे.
चेहऱ्यावर सुरकुत्या जरी आल्या असल्या तरी राम स्वार्थ प्रसाद यांचा आत्मविश्वास एखाद्या मोठ्या नेत्यासारखा आहे. निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कुठून लढणार आहेत निवडणूक ?
बिहारमध्ये बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद चेरिया बेरिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांना उद्योजकाचा दर्जा देणार, मुलांना मोफत शिक्षण देणार, गावातील उद्योग अडचणीत आणणाऱ्या परकीय मालावर बंदी घालणार, अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. मतदारसंघात जास्तीत जास्त लघुउद्योग सुरू करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.