
अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्यामुळे दुःख व्यक्त केले आहे. नोबेल पुरस्कार जाहिर होण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपण पुरस्कारासाठी पात्र असल्याचे खूप वेळा सांगितले होते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक संघर्ष सोडवण्याचे काम कसे केले? आणि आजपर्यंत यशस्वीरित्या आठ युद्धे कशी सोडवली? याबद्दल ते वारंवार बोलत होते. तरी नोबेल पुरस्कार मिळाला नसल्याने ट्रम्प यांनी खंत व्यक्त केली.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणतात, "रवांडा आणि कांगोला जाऊन पहा. भारत आणि पाकिस्तानबद्दल बोला. आम्ही सोडवलेल्या सर्व युद्धांकडे पहा. जेव्हा जेव्हा मी यद्ध सोडवले तेव्हा ते म्हणतात की, जर तुम्ही पुढचे युद्ध सोडवले तर तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळेल. मात्र मला नोबेल पारितोषिक मिळाले नाही."
ट्रम्प असेही म्हणाले की, "आपल्याकडे असा एकही राष्ट्राध्यक्ष नव्हता ज्याने एक युद्ध सोडवले. बुशने तर युद्ध सुरू केले. पण मी लाखो लोकांचे जीव वाचवले. जेव्हा मला समजते की पाकिस्तानने हल्ला केला किंवा अफगाणिस्तानवर हल्ला चालू आहे. तर तो हल्ला थांबवणे माझ्यासाठी सोपे आहे. दरम्यान, मला यूएसए देखील चालवायचे आहे. पण मला युद्ध सोडवायला आवडते. कारण, मला लोकांना मारण्यापासून रोखणे आवडते आणि मी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत."
यावेळी ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार २०२५ च्या विजेत्या मारिया कोरीना मचाडो यांच्याबद्दल सांगितले की, ज्यांनी पुरस्कार मिळवला ती एक खूप चांगली महिला आहे. मला माहित नाही की ती कोण आहे, पण ती खूप उदार होती. पण मला त्या सर्व गोष्टींची पर्वा नाही.