
गांधीनगर : गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. तत्पूर्वी, गुरुवारी मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे, या मंत्रिमंडळ विस्तारात हर्ष संघवी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी २५ आमदारांना पदाची शपथ दिली, ज्यामुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या २६ झाली आहे. गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले आमदार अर्जुन मोढवाडिया यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल, प्रफुल्ल पानशेरिया, कुंवरजी बावलिया यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे. कनुभाई देसाई, पुरुषोत्तम सोळंकी, नरेश पटेल, अहमदाबादच्या माजी उपमहापौर दर्शना वाघेला, गुजरात भाजप एससी मोर्चाचे माजी प्रमुख प्रद्युम्न वाजा, मोरबीचे कांतीलाल अमृतिया आणि वडोदराच्या मनीषा वकील यांनाही मंत्रीपदे बहाल केली आली आहेत.
मिसेस रवींद्र जडेजा मंत्रिमंडळात : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी रिवाबा जडेजा राजपूत संघटना करणी सेनेच्या सदस्या होत्या. २०१८ मध्ये करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले होते, तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्याच वर्षी त्यांना करणी सेनेच्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.