
नव्या सॉफ्टवेअरमुळे कर्मचारी त्रस्त
मुंबई :ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे. आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत असल्यामुळे नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले आहेत.
एसटी आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये दोन वर्षाआधी महामंडळाने बदल केला आहे. त्या माध्यमातून जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली. पण सदर प्रणाली ही सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट होत आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावरती आरक्षण प्रणाली पूर्ण बंद पडली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नव्या प्रणालीमुळे खर्चही वाढला
कर्मचाऱ्यांना मेमो देणे, मशीन इश्यू करणे यासाठी आधी एका गाडीसाठी आरक्षण मेमो प्रिंट काढताना एक कागद लागत होता. आता एकाच मेमोची प्रिंट घेण्यासाठी तीन कागद लागतात. त्यामुळे महामंडळाचा खर्चही वाढला आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितले की, आधीची आरक्षण प्रणाली ही खूप छान आणि सोयीस्कर होती. पण आता जी आरक्षण प्रणाली आहे ती अतिशय अवघड आणि खूप किचकट करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा या आरक्षण प्रणालीवर काम करताना खूप त्रास होत आहे.
‘आवडेल तिथे प्रवास’ पासच्या दरात कपात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीच्या आधी ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना एकूण २० ते २५ टक्के कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते.