
आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य
‘कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन’ हे सर्वांना माहीत आहे. कर्माचे उत्तराधिकारी फक्त आपण स्वतः असतो. आयुष्य सुरू झाले की कर्म सुरू होते. फक्त ते कर्म सात्विक कर्म असेल तर आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही. नीती, धर्म, आचारविचार पाळले तर आपोआप सात्विक कर्म घडते. सात्विक कर्म करण्यासाठी मग कोणाच्या उपदेशाची किंवा आधाराची गरज राहत नाही. नेहमी आपले आपल्या कर्माचा हेतू प्रामाणिक असणे खूप गरजेचे आहे. आपण जन्माला येतो तेव्हापासून आपल्याला समजायला लागते. तेव्हापासून आपले कर्म हे योग्यच असणे गरजेचे आहे. ही काळजी सर्वस्वी आपल्या स्वतःची असते. आपल्यामुळे कोणाला कसलाही त्रास होणार नाही, आपल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, आपल्या कोणत्याही कृत्यामुळे आपण दुसऱ्याला न दुखावणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल उचलताना विचार करूनच उचलावे, विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा. शरीर नश्वर असले तरी आत्मा अमर आहे. पंचमहाभूतांचे शरीर हे एक दिवस विसर्जित करणं क्रमप्राप्त असतं. मग नश्वर शरीर असतानादेखील आपण जीवनात कशा पद्धतीने आचरण करतो हे महत्त्वाचे आहे.
मानवी मनात अनेक इच्छा अपेक्षा असतात तरी सुद्धा आपण आपलं मन सदैव ज्ञान सदृश ठेवलं पाहिजे. जेणेकरून आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे चुकीचे कर्म घडणार नाही. जसं कर्म तसं फळ हा निसर्गाचा नियम आहे. पण कर्म करताना हे कळत नाही हेच सगळ्यात मोठं मानवी जीवनातील दुर्दैव आहे. कर्मफळाला कोणीही अपवाद नाही. निसर्गाचा नियम कोणालाही बदलता येत नाही. वागण्याबोलण्यात सत्यता, निष्ठा आणि सात्विक कर्म असेल तर जेव्हा कर्मफळ मिळेल अथवा कर्म आपला उत्तराधिकारी आपल्याला ठरवेल तेव्हा आपल्याला फार मोठ्या अडचणी उद्भवणार नाहीत. त्यावेळी पश्चात्ताप पण करण्याची आवश्यकता पडणार नाही. असं म्हणतात काहीच घेऊन आलो नाही जातानाही काहीच न्यायचे नाही. पण खर तर जाताना आपण केलेली कर्म आपल्याबरोबरच नेणार आहोत हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपला पैसा, मालमत्ता यात आपले वारसदार असतात पण कर्मात आपण आपले असतो.
कर्म आपला उत्तराधिकारी स्वतः निवडत असतं. आपण जसं कर्म करू तसं फळ हे निश्चित योग्य वेळी आपल्या पदरी पडत असतं. कोणी कितीही बलवान, धनवान, सामर्थ्यवान असला तरी त्याला कर्म फळातून सूट मिळत नाही. वेळ कोणालाही सोडत नाही हे वास्तव आहे. ते मान्य करणं अथवा न करणं हे आपल्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून असतं. कर्मफळ कोणीही टाळू शकत नाही. ज्ञान आणि अज्ञान या जीवनाच्या दोन बाजू आहेत. ज्ञान असेल तर सगळं व्यवस्थित होत असतं; परंतु ज्ञान नुसतं पुस्तकी असून चालत नाही. डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला खूप काही शिकवून जातो. आपला जन्म आपणच सार्थकी लावला पाहिजे ही जाणीव असेल तर मग आपलं प्रत्येक कर्म निसर्गाच्या नियमानुसार नितीनुसार घडतं आणि घडवलं जातं. मुळात जीवनाचा उद्देश समजणं गरजेचं आहे. उद्देश समजला तर योग्य उचित आणि सात्विक कर्म आपल्या हातून नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही.