Thursday, October 16, 2025

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी मदत, अजित पवारांनी दिली ग्वाही

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी मदत, अजित पवारांनी दिली ग्वाही

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीबाबत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना सूचना दिल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत पोहचणार अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. याबाबत राज्याच्या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी स्पष्ट केला. अतिवृष्टीसंदर्भातील अहवाल लवकरच पूर्ण होणार असून अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी दिली असल्याचे अजित पवारांनी सांगितले. शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज हे आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज असल्याचेही अजित पवार म्हणाले.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप नुकसान झाले. काही ठिकाणी संपूर्ण शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर काही ठिकाणी पिकाचे नुकसान झाले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने ३१ हजार कोटींची मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जाहीर केलेल्या रकमेतील थोडीच मदत शेतकऱ्यांना मिळणार, अशी अफवा विरोधकांनी निर्माण केली आहे. यावर राज्य सरकार करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल विरोधक कधीही चांगले बोलणार नाहीत, अशी टीका पवारांनी केली आहे.

Comments
Add Comment