
मेट्रो प्रवाशांचा प्रवास होणार आणखी सुलभ
१) बीकेसीमध्ये, मार्ग एनएससी, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय यांसारख्या प्रमुख ठिकाणांवरून जाईल. २) वरळीमध्ये, सेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क यांना कव्हर करेल. ३) सीएसएमटीमध्ये, मार्ग जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी. मुखर्जी चौक, के. सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानकाशी जोडला जाईल.
सिटीफ्लो अॅप, मेट्रोकनेक्ट ३ अॅपवर तिकीट सुविधा गर्दीच्या वेळी या बस दर १० मिनिटांनी धावतील. सुरूवातीचे भाडे प्रति प्रवास २९ असून, मासिक पास ४९९ मध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खरेदीची सुविधा सिटीफ्लो अॅप तसेच मेट्रोकनेक्ट ३ अॅपवर एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“मेट्रो मार्ग-३ मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत नवे पर्व घेऊन आली आहे. प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विश्वसनीय फीडर सेवा तितकीच महत्त्वाची आहे. सिटीफ्लोच्या माध्यमातून ही सेवा प्रवाशांच्या दारापर्यंत मेट्रोच्या सोयीचा विस्तार करेल”. - आर. रमणा, एमएमआरसी संचालक (नियोजन व रिअल इस्टेट विकास / एनएफबीआर)
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि सिटीफ्लो यांच्या संयुक्त उपक्रमातून मेट्रोमार्ग ३ (अॅक्वा लाईन) प्रवाशांसाठी विशेष फीडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना प्रमुख स्थानकांवरून सहज प्रवाससुविधा उपलब्ध होणार आहेत.
एमएमआरसी आणि सिटीफ्लो यांचा हा उपक्रम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकत्रीकरणातील महत्त्वाचे पाऊल ठरतो आहे. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. या फीडर बस सेवा सुरूवातीला तीन प्रमुख मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असतील : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), ज्यामुळे महत्त्वाच्या व्यावसायिक आणि निवासी भागांमध्ये सुलभ संपर्क साधता येणार आहे. या फीडर मार्गांमुळे नागरिकांना शाश्वत, सामायिक आणि तंत्रज्ञानाधारित प्रवास पद्धतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल, असे सिटीफ्लोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेरिन वेनाड यांनी सांगितले.