
मुंबई : 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनीने त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी विनापरवानगी 'गोलमाल' आणि 'फिर हेराफेरी' या चित्रपटांचे काही भाग, रील, क्लिप, पोस्टर आदींचा वापर केला. यामुळे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप 'शेमारू एंटरटेनमेंट' या कंपनीने केला. 'शेमारू एंटरटेनमेंट' या कंपनीकडे 'गोलमाल' आणि 'फिर हेराफेरी'सह अनेक चित्रपटांचे स्वामित्व हक्क आहेत. पण 'शेमारू एंटरटेनमेंट'ची परवानगी न घेता 'येवले अमृततुल्य'ने 'गोलमाल' आणि 'फिर हेराफेरी' या चित्रपटांतील दृश्यांचा व्यावसायिक हेतूने वापर केला. या प्रकरणात 'येवले अमृततुल्य'मुळे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार 'शेमारू एंटरटेनमेंट'ने केली. या तक्रारीआधारे मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनी विरोधात आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
'शेमारू एंटरटेनमेंट'ने 'येवले अमृततुल्य' या कंपनीला नोटीस बजावली होती. चित्रपटांच्या स्वामित्व हक्कांची जाणीव करुन दिली होती. तसेच चित्रपटांतील भागांचा वापर करुन तयार केलेले सोशल मीडिया प्रमोशनचे सर्व कंटेंट हटवावे असेही सांगितले होते. पण 'येवले अमृततुल्य' कंटेंट हटवणे टाळले. अखेर 'शेमारू एंटरटेनमेंट'ने 'येवले अमृततुल्य' विरोधात तक्रार केली. या तक्रारीआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला. शेमारू कंपनीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी 'येवले अमृततुल्य' या कंपनीसह नवनाथ येवले, मंगेश येवले, गणेश येवले, नीलेश येवले, तेजस येवले यांच्याविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यामुळे 'येवले अमृततुल्य' ही चहाची कंपनी आणि कंपनीचे संचालक कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडिया प्रमोशन करताना केलेली कृती 'येवले अमृततुल्य'ला भोवणार की नाही, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.