
देशात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी अनेकांची नावं समोर येत आहेत. या रणधुमाळीत अकाली जीवन संपवलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहीणही निवडणूक लढवणार असल्याची बातमी समोर आली आहे. दिव्या गौतम असे सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचे नाव आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाने तिला उमेदवारी दिली आहे. पाटण्यातील 'दीघा' मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार असल्याने या मतदारसंघाचा समावेश चर्चेतल्या मतदारसंघांमध्ये झाला आहे. १५ऑक्टोबर रोजी दिव्या गौतम ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तिची पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
दिव्या गौतम ही बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मामेबहीण आहे. भाकपा (माले) पक्षाने तिला पाटण्यातील दीघा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. इंडिया आघाडीतील जागा वाटपात ही जागा भाकपच्या वाट्याला आली आहे.
कोण आहे दिव्या गौतम?
सुशांत सिंह राजपूत याची मामेबहीण म्हणून दिव्या गौतम जरी परिचित असली, तरी ही तिची एकमेव ओळख नाही. तिने आपल्या बळावर राजकारणात आपले नाव निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून केला आहे. पाटणा विद्यापीठातील पाटणा कॉलेजमधून तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासून ती राजकारणात सक्रिय आहे. २०१२ साली शिक्षण सुरू असतानाच ती अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेत सक्रीय होती. तेव्हापासूनच तिच्यातील लीडरशीप क्वालिटी चर्चेत आली होती. नेतृत्वगुणांमुळे ती त्या काळात चर्चेत आली होती.
डिग्री पूर्ण केल्यानंतर दिव्याने असिस्टन्ट प्रोफेसर म्हणून शिकवण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने बीपीएससी परीक्षा पार करून सरकारी नोकरी मिळवली. ती काही काळ बिहार सरकारच्या अन्न व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून काम करत होती. मात्र नंतर वैयक्तिक कारणांमुळे तिने ही नोकरी सोडली.
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेतर्फे तिने पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात तिला यश मिळाले नव्हते. दिव्या गौतमने पहिल्याच प्रयत्नात बिहार पब्लिस सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास केली होती आणि तिने यात ६४ वा क्रमांक मिळवला होता. यानंतर तिची नियुक्ती अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून करण्यात आली होती. मात्र तिने सरकारी नोकरी करायची नाही असा निर्णय आधीच घेतला होता. दिव्या सध्या पीएचडी करत असून तिने नेटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
या आधी झालेल्या म्हणजेच २०२०साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पाटण्यातील दीघा मतदारसंघातून भाजपचे संजीव चौरसिया विजयी झाले होते. त्यांनी ९७०४४ मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांनी भाकपच्या शशी यादव यांचा पराभव केला होता. यादव यांना ५०९७१ मते मिळाली होती. लोक फक्त एक उमेदवार नाही तर एक इन्स्पिरेशन म्हणून तिच्याकडे पाहत आहेत.