
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम चौपाटी परिसरात पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. बुधवारी १५ ऑक्टोबर २०२५ पासून माहीम सी फूड प्लाझा येथे महिला बचत गटांचे स्टॉल्स् कार्यरत झाले आहेत. आकर्षक रंगसंगती, सेल्फी पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि स्थानिक कोळी गीतांचा आणि पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी सुशोभीकरण करतानाच महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी लगत सुरू करण्यात आला. या सी फूड प्लाझाला हजारो पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिली आहे. या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देशही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या जी (उत्तर) विभागाच्या वतीने प्रत्येक महिला बचतगटाला याआधीच साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. तसेच सी फूड प्लाझा परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, या ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिक तसेच पर्यटकांकरिता अधिकाधिक सेवासुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. विशेषतः पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, प्रसाधनगृहे उपलब्ध करून देतानाच एकूणच उत्तम व्यवस्था राखण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
माहीम सी फूड प्लाझाला नवी झळाळी
माहीम चौपाटी स्थित सी फूड प्लाझाच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच सी फूड प्लाझा परिसरातील घरांना विशिष्ट रंगसंगती करण्यात आली आहे. महिला बचत गटांना व्यवसायासाठी देण्यात आलेल्या स्टॉल्सची डागडुजी, स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच आकर्षक अशा रोषणाई करण्यात आली आहे. नागरिoodकांना आणि पर्यटकांना सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी छायाचित्रं घेण्याचीही उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे.
कोळी महिलांना बचत गटाचे महत्त्व पटवून देण्यापासून ते रोजगारासाठी ‘सी फूड प्लाझा’ची संकल्पना सांगण्यासाठी याआधीही सातत्याने समुपदेशन करण्यात आले आहे. त्यासोबतच महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण आणि विक्रीयोग्य मत्स्य आधारित उत्पादने तयार करण्यासाठी मत्स्यपालन क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य उपलब्ध करून देणे हा प्रशिक्षणामागचा उद्देश होता. परिणामी कौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, याचा प्रयत्न बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबईतील कोळीवाडे आणि येथील खाद्यसंस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोळीवाड्यांचे संवर्धन आणि कोळी खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देऊन कोळी संस्कृती आणि कोळी खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी केले आहे.