
पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड वापरून जाहिरात बनवत असतात. पण पिंपरी-चिंचवडमधील एका तरुणाला आपल्या फटाक्यांच्या दुकानाच्या प्रचारासाठी वापरलेली 'गुन्हेगारी ढंगातील' स्टाईल चांगलीच अंगलट आली आहे. या तरुणाने तयार केलेला व्हिडिओ व्हायरल होताच, वाकड पोलिसांनी त्याला तात्काळ पोलीस ठाण्यात बोलावून चांगलीच समज दिली.
वाकड परिसरातील एका तरुणाने आपल्या फटाक्यांच्या दुकानासाठी बनवलेल्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये गुन्हेगारी शैली आणि हिंसक वागणुकीचे सादरीकरण केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यातील आशय समाजात चुकीचा संदेश देणारा असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली.
पोलिसांची तात्काळ दखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाकड पोलिसांनी संबंधित तरुणाला तातडीने चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, व्यवसायाच्या नावाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडिओज् बनवणे हे कायद्याच्या चौकटीबाहेरचे असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल.
लाइक्स, व्ह्यूज आणि लोकप्रियतेच्या नादात अनेकजण मर्यादा ओलांडत असल्याचे दिसून येते. परंतु, सोशल मीडियावर प्रभाव निर्माण करताना सामाजिक जबाबदारी आणि कायद्याचे भान ठेवणे गरजेचे आहे, असा संदेश पोलिसांनी या घटनेद्वारे दिला आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर जाहिरात करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कृतींचे परिणाम समजून घेणे आणि समाजात सकारात्मक संदेश देण्याची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.