Monday, October 13, 2025

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असताना नव्हे, तर घरी झोपलेले असताना बेडवरून खाली पडल्याने त्यांचा दुःखद अंत झाला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, उत्तरीय तपासणी अहवालातून मृत्यूचे कारण समोर आले आहे.

संभाजी शिवाजी दोलतोडे (वय ३२, रा. अरविंद धाम, पोलीस वसाहत सोलापूर) असे या मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. रोजच्याप्रमाणे ते रात्री आपल्या निवासस्थानी झोपले होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ते झोपेतच अचानक बेडवरून खाली पडले.

अचानक झालेल्या या अपघातामुळे दोलतोडे यांच्या डोक्यामागील बाजूस गंभीर मार लागला. मार लागल्यानंतर त्यांना तात्काळ उलटीही झाली. पत्नीने लागलीच त्यांना उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना तातडीने अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणीनंतर संभाजी दोलतोडे यांना मृत घोषित केले. या आकस्मिक घटनेमुळे दोलतोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस नाईक चव्हाण यांनी दिली.

सोलापूर शहर वाहतूक शाखेतील मृत पोलीस अंमलदार संभाजी दोलतोडे हे मूळगाव उपळाई खुर्द येथील होते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी संभाजी यांच्यावरच होती. संभाजी यांना एक आठ वर्षाची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. संभाजी दोलतोडे पार्थिवावर अंत्यविधी मूळ गावी करण्यात आला. संभाजी यांच्या अंत्यविधीला मोठी गर्दी होती.

अवघ्या बत्तीस वर्षांच्या तरुण अंमलदाराच्या अशा अचानक जाण्याने सोलापूर शहर पोलीस दलातील त्यांचे मित्र आणि सहकारी यांनाही मोठा धक्का बसला असून, पोलीस वसाहतीत शोकाकुल वातावरण आहे.

Comments
Add Comment