
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या १८ संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाचं हत्यार उपसले आहे. सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होणार असून, आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात रविवारी कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समिती मधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील या संघटनानी सोमवारपासून आंदोलनाची नोटीस दिली आहे. आता हे आंदोलन मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर होणार आहे.
दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. त्यामध्ये थकीत देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आला नाही तर धरणे व ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू राहील असेही कृती समितीच्या बैठकीत ठरले आहे.