
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र, सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांना या यादीत स्थान नव्हते. त्यामुळे नाराज एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचं इशारा दिला होता. आता सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत बोनस जाहीर केला आहे, ज्यामुळे संप टळला असून कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी ६००० रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, १२,५०० रुपयांची उचल घेण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो पुढील ४८ आठवड्यांपर्यंत लागू राहणार आहे.
एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असून, वेळेवर पगार मिळण्यात अडथळे येत होते. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेण्याची मागणी सुरू आहे, मात्र त्यावर अजून तोडगा निघालेला नाही.
सरकारने दिवाळीपूर्वीच ही आर्थिक मदत आणि बोनस जाहीर करून कामगारांच्या रोषाला थोपवले आहे. त्यामुळे संभाव्य संप टळला असून, एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खरंच गोड ठरणार आहे.